अखेर ‘ती’ पोहोचली पालकांच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:30+5:302021-02-05T04:39:30+5:30

काटोल: इंस्टाग्रामवर बिहार येथील एका तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली़ त्यानंतर त्या तरुणाला भेटण्यासाठी घर सोडून बिहारला निघालेल्या ...

Finally, she reached her parents' arms | अखेर ‘ती’ पोहोचली पालकांच्या कुशीत

अखेर ‘ती’ पोहोचली पालकांच्या कुशीत

Next

काटोल: इंस्टाग्रामवर बिहार येथील एका तरुणासोबत अल्पवयीन मुलीची मैत्री झाली़ त्यानंतर त्या तरुणाला भेटण्यासाठी घर सोडून बिहारला निघालेल्या १३ वर्षीय मुलीच्या शोध घेत काटोल पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथून ताब्यात घेत तिला पालकांच्या स्वाधीन केले. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा स्वीकार करून ऑनलाईन अध्यापनाचे काम केले़ या पध्दतीमुळे अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल आले़ दिवसभर मोबाईल त्यांच्या हातात राहत असल्याने त्यांना समाजमाध्यमाची सवय लागली़ या समाजमाध्यमातून अल्पवयीन मुलांच्या फसवणुकीचे गुन्हे घडले़ इंस्टाग्रामवर बिहार येथील तरुणासोबत ओळख झाल्यानंतर त्या मुलाने अल्पवयीन मुलीला बिहार येथे बोलावून घेतले़ मात्र अनुचित प्रकार घडण्याआधीच काटोल पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेतला. तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय मुलीला शैक्षणिक कामासाठी पालकांनी दोन महिन्याआधी मोबाईल घेऊन दिला होता़ फावल्या वेळेत ही मुलगी समाजमाध्यमाचा वापर करीत होती़ दरम्यान इंस्टाग्रामवर तिची बिहार येथील एका तरुणासोबत ओळख झाली़ मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत या तरुणाने २५ जानेवारीला मुलीला बिहार येथे बोलावले़ याच दिवशी दुपारी ३ वाजता मुलगी बिहारसाठी रवाना झाली़ काटोल बस स्थानकावरून नागपूर. यानंतर नागपूर येथून एर्नाकुलम एक्सप्रेसने ती रवाना झाली़ इकडे रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध घेऊनही ती दिसून न आल्याने पालकांनी पोलिसात तक्रार दिली़ घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार महादेव आचरेकर यांनी मुलीजवळ असलेल्या मोबाईलचे लोकेशन घेत तिच्या वडिलांसह एक चमू हुशंगाबाद येथे रवाना केला.

वडील, पोलिसांचा जीव भांड्यात पडला

मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलीस मुलीचा पाठलाग करीत होते. मध्येच तीचा मोबाईल बंद झाल्याने लाईव्ह लोकेशन पोलिसांना मिळणे बंद झाले़ मात्र काही वेळात तिचा मोबाईल सुरू होताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला़ याच काळात काटोल पोलिसांनी नागपूर येथून बिहारला जाणाऱ्या रेल्वेची माहिती काढली़ या रेल्वेमधील एका डब्यात ती मुलगी असल्याची माहिती मिळाली़ रेल्वेगाडीचे लोकेशन काढले असता तिचा पुढील थांबा हा उत्तरप्रदेशातील गोंडा असल्याचे समजले़ तोच तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून मुलीचा शोध घेण्यास कळविण्यात आले़ रेल्वे पोलिसांनी बोगीची तपासणी केली असता या बोगीमध्ये ही मुलगी प्रवास करीत असल्याचे दिसून आले.

तरुण देत होता सूचना

मुलगी सलग दोन दिवस ९०० कि.मी.चा प्रवास बिहार येथील मुलाच्या सूचनेवरून करीत होती़ या तरुणाने तिला बिहार येथील समस्तीपूर येथे बोलावले होते़ घर सोडल्यापासून ते पोलिसांनी ताब्यात घेईपर्यंत ही मुलगी त्याच्याच सूचनांचे पालन करीत होती़ ज्यावेळी मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळत होते़ ही कारवाई ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार प्रभाकर घोरमाडे, महिला पोलीस हवालदार मोरे, पोलीस नायक धीरज खंते, पोलीस शिपाई आशिष हिरुडकर, सायबर सेल नागपूर ग्रामीणचे पीएसआय जावेद शेख, पोलीस शिपाई सतीश राठोड, पोलीस शिपाई योगेश राजगिरे यांनी पार पाडली़. पोलिसांच्या या कामगिरीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौैतुक केले.

Web Title: Finally, she reached her parents' arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.