नागपुरातील महिलेने शोधून काढल्या चोरीस गेलेल्या बकऱ्या ; तपास कौशल्याने पोलीसही चाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:01 AM2017-12-16T10:01:29+5:302017-12-16T10:04:10+5:30
चोरीच्या प्रकरणात पोलिसांवर विसंबून न राहता तब्बल तीन दिवस सतत परिश्रम घेऊन एका महिलेने चोरीचा छडा लावला.
नरेश डोंगरे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : चोरीच्या प्रकरणात पोलिसांवर विसंबून न राहता तब्बल तीन दिवस सतत परिश्रम घेऊन एका महिलेने चोरीचा छडा लावला. नुसता छडाच लावला नाही तर या गरीब महिलेने आपल्या बुद्धिकौशल्याचा परिचय देत चोरट्यांची एक टोळीदेखिल पोलिसांच्या पुढ्यात ठेवली. या टोळीला अटक करण्यात पोलिसांना आता पाच दिवस झाले तरी यश मिळालेले नाही. हायटेक पोलिसांना चाट पाडणारे हे प्रकरण आहे. या प्रकरणातून पोलिसांची बेफिकिरी आणि एका सर्वसाधारण महिलेचे तपास कौशल्य प्रकाशझोतात आले आहे.
तपास कसा करावा, याचे उदाहरण पोलिसांसमोर ठेवणाऱ्या या महिलेचे नाव अर्चना कळसाईत बागडे (वय ३५) आहे. अत्यंत गरीब परिवारातील अर्चना मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा ओढते. शेळ्या (बकऱ्या) पालनही करते. तिच्याकडे असलेल्या बकऱ्यांपैकी ६ बकऱ्या ६ डिसेंबरला चोरीला गेल्या. २० ते २५ हजारांच्या बकऱ्या चोरीला गेल्याने अर्चना कमालीची अस्वस्थ झाली. ती रडतच कळमना ठाण्यात आली. कळमना पोलिसांनी तिची बकऱ्या चोरीच्या तक्रारीची औपचारिक नोंद घेऊन तिला परत पाठविले. पोलीस आपल्या चोरीला गेलेल्या बकऱ्या शोधणार नाही, हे पोलिसांच्या एकूणच वर्तनावरून अर्चनाच्या लक्षात आले. त्यामुळे ती स्वत:च रात्रंदिवस आपल्या बकऱ्या शोधण्यासाठी पायपीट करू लागली. चोरीला गेलेल्या बकऱ्या मटन विक्रेत्याला आरोपींनी विकल्या असाव्यात, असा अंदाज बांधून अर्चनाने आपली तपास मोहीम सुरू केली. तब्बल तीन दिवस तीन रात्री अर्चना शहरातील विविध भागात असलेल्या मटन मार्केटमध्ये जाऊन एकेका दुकानदाराकडे पाहणी करू लागली. अखेर ९ डिसेंबरच्या सायंकाळी अर्चनाला जरीपटक्यातील एका मटन विक्रेत्याच्या दुकानात तीन बकऱ्याची कापलेली मुंडकी दिसली. त्या आपल्याच बकऱ्या असल्याचे अर्चनाने ओळखले. मटन विक्रेत्याला याबाबत जाब विचारला तर तो तातडीने ती मुंडकी दुसऱ्याला विकून त्याची विल्हेवाट लावेल, हे लक्षात घेत अर्चना मटन विक्रेत्याकडे गेली. तिने त्या तीन मुंडक्यांची किंमत विचारून मटन विक्रेत्याला काही पैसे अॅडव्हॉन्स म्हणून दिले. घरी पाहुणे आहेत, मी लगेच पैसे घेऊन येते, असे सांगून त्याला ती दुसऱ्याला न विकण्याची विनंती केली.
दामदुप्पट पैसे मिळत असल्याने मटन विक्रेत्यानेही ते मान्य केले.
दरम्यान, घटनास्थळापासून कळमना पोलीस ठाणे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तेथे जाऊन परत येईपर्यंत किमान दीड-दोन तासांचा वेळ लागेल, हे ध्यानात आल्याने अर्चना काही अंतरावरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात पोहचली. तीन दिवसांपूर्वी बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. त्याची तक्रार कळमना ठाण्यात दाखल असून, त्या बकऱ्या जरीपटक्यातील एका मटन विक्रेत्याने विकत घेऊन कापल्या, त्याचा आपल्याला पुरावा मिळाला आहे, असे सांगत तिने ड्युटीवरील पोलिसांना तेथे चलण्यास बाध्य केले. पोलिसांना सोबत घेऊन ती मटन विक्रेत्याकडे पोहचली. पोलिसांनी मटन विक्रेत्याला जुजबी विचारणा करीत ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री हे प्रकरण जरीपटका पोलिसांनी कळमना ठाण्यात वर्ग केले. कळमना पोलिसांनी दुसऱ्या दिवशी या प्रकरणाची कागदपत्रे तयार करीत मटन विक्रेत्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला ११ डिसेंबरला अटक केली.
चोरट्यांची टोळी बाहेरच्या बाहेर
कळमना पोलिसांच्या माहितीनुसार, मटन विक्रेत्याची तीन दिवस पोलीस कोठडी मिळवण्यात आली. गुरुवारी त्याचा पीसीआर संपला अन् तो मोकळा झाला. तीन दिवसांच्या चौकशीत पोलिसांना बकऱ्या चोरणाऱ्या टोळीचा छडा मात्र लावता आला नाही. मटन विक्रेत्याकडे आढळलेली मुंडकी अर्चनाच्या बकऱ्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या बकऱ्या मोमिनपुऱ्यांच्या मंडीतून मटन विक्रेत्याने विकत घेतल्या. त्यामुळे त्या कुणी चोरल्या होत्या आणि चोरीच्या बकऱ्या कुणी विकत घेतल्या, ते उघड होऊ शकले नाही, असे कळमना पोलीस सांगतात. अर्थात बकऱ्या चोरणारी टोळी मोकाटच आहे.
कौतुक, लज्जा आणि चिंतन
कोणताही धागादोरा, कोणतेही साधन नसताना गरीब अर्चनाने रात्रीचा दिवस करीत ७२ तासात तिच्या बकऱ्या चोरणाऱ्या टोळीतील एक दुवा शोधून काढला. हा दुवा (आरोपी) आणि सर्व साधनसुविधा उपलब्ध असूनही तीन दिवसांच्या पीसीआरमधून मटन विक्रेत्याच्या माध्यमातून बकऱ्या चोरणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांना लावता आला नाही. हायटेक होण्याचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यात सर्वसाधारण अर्चनाचे तपासकौशल्य झणझणीत अंजन घालणारे ठरावे. अर्चनाचे त्यासाठी कौतुक व्हायला पाहिजे. दुसरीकडे चोरीचा माल विकत घेणारा आरोपी हातात असूनही त्याच्या साथीदारांची गचांडी पकडण्याचे कौशल्य जरीपटका किंवा कळमना पोलीस दाखवू शकले नाही, बाब लज्जास्पद ठरावी. दोन्ही बाबी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी चिंतनाचा विषय ठरतात.