अखेर शिवसेनेची माघार, सुधाकर अडबालेंना काँग्रेसचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 09:39 PM2023-01-16T21:39:56+5:302023-01-16T21:41:27+5:30
Nagpur News आता अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढतील. या निवडणुकीत भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडी समर्थित विमाशिचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात अखेर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माघार घेत ही जागा काँग्रेसच्या कोट्यात सोडण्यास संमती दिली. शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर सोमवारी रात्री विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे (विमाशि) उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देत असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. आता अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढतील. या निवडणुकीत भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडी समर्थित विमाशिचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
दरम्यान, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनी अखेरच्या दिवशीही अर्ज मागे न घेतल्याने त्यांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत नागपूरची जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेवटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जागा शिवसेनेला सोडली नसल्याचे सांगत १५ जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होईल व त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार रविवारी रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. या चर्चेत नाना पटोले यांनी नाशिकची जागा शिवसेनेला सोडली असल्यामुळे नागपूरची जागा काँग्रेसला सोडावी, असा आग्रह धरला व शिवसेनेने तो मान्य केला. त्यानुसार सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने गंगाधर नाकाडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर रात्री काँग्रेसकडून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर करण्यात आले. ही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने नाना पटोले यांच्या भूमिकेवरच शंका घेतली जात होती. मात्र, पटोलेंनी जागा काँग्रेसकडे खेचून आणल्याने विरोधातील चर्चांना विराम लावला.
अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीचे इटकेलवार निलंबित
- दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला नव्हता. पक्षाकडून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र, ते ‘नॉट रिचेबल’ होते. त्यांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच पक्षाचा पाठिंबा असेल, असे पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे व जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी संयुक्तरित्या स्पष्ट केले.