उपराजधानीत अखेर बीव्हीजी कर्मचाऱ्यांचा संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 09:26 PM2021-01-19T21:26:24+5:302021-01-19T21:27:46+5:30
Nagpur news बीव्हीजी कंपनीने ११३ जणांना अचानक कामावरून काढल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मंगळवारी मागे घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बीव्हीजी कंपनीने ११३ जणांना अचानक कामावरून काढल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मंगळवारी मागे घेण्यात आला. तीन दिवसांपासून अर्ध्या शहरातील ठप्प असलेले कचरा संकलन मंगळवारी सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दुसरीकडे प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला.
संपावरील कर्मचारी सोमवारी दुपारी मनपा आयुक्तांच्या कार्यालयावर धडकले होते. या संपामुळे प्रशासन कोंडीत सापडले होते. बीव्हीजी कंपनी व्यवस्थापनाला प्रशासनाने नोटीस बजावून संपावर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. कामावरून काढलेल्या ११३ कर्मचाऱ्यांबाबत मात्र ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. दंडात्मक कारवाई होणार शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांवर आहे. कचरा संकलन ठप्प पडल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाईचे अधिकार मनपा आयुक्तांना आहेत. यात बिलाच्या दहापट दंड आकारण्याचे अधिकार आहे. प्रशासनस्तरावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.