अखेर ‘तो’ टीसी पोहोचला लोहमार्ग पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:06 AM2019-03-12T01:06:15+5:302019-03-12T01:06:52+5:30
नागपूर रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग करणाऱ्या टीसीने अखेर लोहमार्ग ठाण्यात हजेरी लावली. हजर होण्यापूर्वी या टीसीने अटकपूर्व जामीन मिळविला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या पत्रावरून रेल्वे प्रशासनाने या टीसीवर निलंबनाची कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग करणाऱ्या टीसीने अखेर लोहमार्ग ठाण्यात हजेरी लावली. हजर होण्यापूर्वी या टीसीने अटकपूर्व जामीन मिळविला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या पत्रावरून रेल्वे प्रशासनाने या टीसीवर निलंबनाची कारवाई केली आहे.
अमित बारालिया (२८) रा. शेगाव, जि. अकोला असे त्या टीसीचे नाव आहे. तो मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी असून राष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडूही आहे. २१ जानेवारी रोजी त्याने नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर विनातिकीट आढळलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला अजनी येथील रेल्वे क्वॉर्टरमध्ये नेले. तेथे तिचा विनयभंग केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी सोडूनही दिले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३५४,३६३,३६६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी टीसी जवळपास ५८ दिवस फरार होता. त्यामुळे लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली होती. दरम्यानच्या काळात तो कामावर रुजू झाला नाही. दरम्यान टीसीने न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेऊन नागपूर लोहमार्ग ठाण्यात पोहोचला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाशी पत्रव्यवहार केला. लोहमार्ग पोलिसांचे पत्र मिळताच रेल्वे प्रशासनाने संबंधित टीसीवर निलंबनाची कारवाई केली आहे.