अखेर प्रसाद कांबळींच्या कार्यकाळाचा झाला अस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:59+5:302021-09-16T04:12:59+5:30
- शरद पवार यांचे नाट्य परिषद अध्यक्ष नरेश गडेकरांना विश्वस्तांची नेमणूक करण्याचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या ...
- शरद पवार यांचे नाट्य परिषद अध्यक्ष नरेश गडेकरांना विश्वस्तांची नेमणूक करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या सात-आठ महिन्यांपासून नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या नाट्यकारणाचा तिढा सुटला असून तहहयात विश्वस्त शरद पवार व शशी प्रभू यांनी संयुक्तरीत्या पाठविलेल्या पत्रात प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर यांना अध्यक्ष म्हणून संबोधत नाट्य परिषदेच्या उर्वरित विश्वस्तांची नेमणूक तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रव्यवहारामुळे ३ सप्टेंबरपर्यंत स्वत:ला नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून मिरवत असलेल्या प्रसाद कांबळी यांच्या कार्यकाळाचा अस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांना याच पत्रातून दम भरत, विश्वस्त मंडळातील रिक्त चार जागा भरण्याच्या कार्यात नियामक मंडळाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. २०१७ मध्ये नाट्य परिषदेच्या नव्या घटनादुरुस्तीनंतर नऊ जणांचे विश्वस्त मंडळ असेल, असे निश्चित झाले होते. त्यात अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह या दोन पदसिद्ध विश्वस्तांचा समावेश आहे. उरलेल्या सात जणांपैकी शरद पवार, शशी प्रभू व डॉ. रवी बापट हे तिघे तहहयात विश्वस्त आहेत तर चारुदत्त सरपोतदार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे, चार विश्वस्तांची जागा भरणे अभिप्रेत होते. मात्र, प्रमुख कार्यवाहांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने, आता त्या जागा येत्या १५ दिवसात विशेष सभा घेऊन भरण्याचे आवाहन पवार व प्रभू यांनी अध्यक्ष नरेश गडेकर यांना केले आहे. याबाबत नुकतीच शरद पवार यांच्या दालनात बैठक पार पडली होती, हे विशेष.
...............................