अखेर जखमी वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू; जखमी अवस्थेत केले हाेते रेस्क्यू
By निशांत वानखेडे | Published: June 25, 2023 09:09 PM2023-06-25T21:09:12+5:302023-06-25T21:09:32+5:30
दक्षिण उमरेड वनक्षेत्राला लागून असलेल्या म्हसाळा गावातून गंभीर जखमी अवस्थेत रेस्क्यू केलेल्या वाघाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नागपूर : दक्षिण उमरेड वनक्षेत्राला लागून असलेल्या म्हसाळा गावातून गंभीर जखमी अवस्थेत रेस्क्यू केलेल्या वाघाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्याच्यावर सेमिनरी हिल्सच्या ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये उपचार सुरू हाेता. वेटर्नरी डाॅक्टरांच्या मते जखमेमुळे वाघाच्या शरीरात विष पसरले हाेते, ज्यामुळे त्याच्या शरीराचे अंग काम करणे बंद झाले हाेते.
साेमवारी १९ जून राेजी हा वाघ उमरेड चारगाव उपवनक्षेत्राच्या नियत क्षेत्रालगतच्या म्हसाळा गावाजवळ जखमी अवस्थेत बसलेला दिसून आला. त्याच्या दाेन पायाचे पंजे आणि शरीरावर गंभीर जखमा हाेत्या. माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या वाघाला ट्रान्झिट सेंटरला आणले हाेते. उपचाराला फारसा प्रतिसाद मिळत नसताना रविवारी त्याचा मृत्यु झाला.
त्यानंतर एनटीसीएच्या मार्गदर्शक सुचनानुसार डिसीएफ डाॅ. भारतसिंह हाडा, एसीएफ अतुल देवकर, विजय गंगावने, आरएफओ प्रतिभा रामटेके, कुंदन हाते, विनीत अराेरा यांच्या उपस्थितीत डाॅ. स्मिता रामटेके, डाॅ. स्वप्नील साेनावने, डाॅ. विनाेद समर्थ यांनी वाघाचे शवविच्छेदन केले व त्याचे नमुने उत्तरीय तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.