अखेर पावसाळ्याने विदर्भातून गाशा गुंडाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 08:36 PM2022-10-22T20:36:25+5:302022-10-22T20:36:59+5:30
Nagpur News लांब मुक्काम ठाेकलेल्या मान्सूनने अखेर विदर्भातून आपला गाशा गुंडाळला आहे. महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास अखेरच्या टप्प्यात असून २४ ऑक्टाेबर पर्यंत पूर्ण एक्झिट हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
नागपूर : आज जाईल,उद्या जाईल असे करीत लांब मुक्काम ठाेकलेल्या मान्सूनने अखेर विदर्भातून आपला गाशा गुंडाळला आहे. महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास अखेरच्या टप्प्यात असून २४ ऑक्टाेबर पर्यंत पूर्ण एक्झिट हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दाेन दिवसांपासून विदर्भात आकाश स्वच्छ आणि निरभ्र आहे. त्यामुळे आर्द्रता सुद्धा ५५ ते ६५ टक्क्यापर्यंत खाली आली आहे. तापमानातही काही अंशाची वाढ झाली आहे. मात्र ऑक्टाेबर हिटचा परिणाम कुठेही जाणवत नाही. रात्रीच्या तापमानात घसरण झाली असून थंडीची जाणीव हाेत आहे.
दरम्यान विदर्भ व मराठवाडा वगळता राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण हाेते आणि तुरळक ठिकाणी अगदीच क्षुल्लक पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे. २३ पासून मात्र सर्वत्र निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल. २४ ऑक्टाेबर हा महाराष्ट्रात रेंगाळलेल्या पावसाळ्याचा अखेरचा दिवस ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुढचे काही दिवस अशीच उघडीप राहणार असून दिवाळीत पाऊस पडण्याची शक्यता अजिबात नाही.
सध्या तापमानातील फरक पाहता पहाटेचे किमान तापमान हे सरासरी पेक्षा ३ डिग्रीने अधिक म्हणून अपेक्षित थंडीचा अभाव तर दुपारचे कमाल तापमान हे सरासरी पेक्षा ३ डिग्रीने कमी म्हणून ऑक्टोबर हिटचा ही अभाव जाणवतो आहे. त्याचबरोबर आजपासून निरभ्र आकाशासहित हळूहळू थंडीतही वाढ होईल. चक्रीवादळाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही.