अखेर भाजपमधील सस्पेन्स दूर, दटके-कोहळे-माने यांना उमेदवारी
By योगेश पांडे | Published: October 28, 2024 05:03 PM2024-10-28T17:03:56+5:302024-10-28T17:04:24+5:30
सावनेरमधून आशीष देशमुख तर काटोलमधून चरणसिंग ठाकूर मैदानात : लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारांची बहुप्रतिक्षित यादी जारी झाली असून अखेर मध्य, पश्चिम व उत्तर नागपुरातील सस्पेन्स दूर झाला आहे. भाजपने मध्य नागपुरातून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांचे तिकीट कापून तेथे विधानपरिषद आमदार प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली आहे. तर पश्चिम नागपुरातून ‘सरप्राईज’ देत दक्षिण नागपुरचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांना रिंगणात उतरविले आहे. तर उत्तर नागपुरातून परत एकदा डॉ.मिलींद माने यांनाच संधी मिळाली आहे. याशिवाय सावनेरमधून आशीष देशमुख व काटोलमधून चरणसिंग ठाकूर यांना मैदानात उतरविले आहे. उमरेडमधून भाजपने उमेदवार जाहीर केला नसल्याने सुधीर पारवे यांचे काय होणार व शिंदेसेनेकडून तेथे कुणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
भाजपने पहिल्या टप्प्यात दक्षिण-पश्चिम, पुर्व, दक्षिण, कामठी, हिंगणा येथील उमेदवार जाहीर केले होते. उर्वरित जागांची घोषणा कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मध्य नागपुरात भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. येथे हलबा समाजाचा उमेदवार द्यावा या मागणीने जोर धरला होता. मात्र दटके यांचा ‘पब्लिक कनेक्ट’ व कॉंग्रेसचा तरुण उमेदवार लक्षात घेता भाजपने त्यांच्यावरच विश्वास टाकला. दुसरीकडे पश्चिम नागपुरात माजी महापौर दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, जयप्रकाश गुप्ता यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. जोशी समर्थक तर रस्त्यावर उतरले होते व हिंदी भाषिकांनी तर आंदोलनदेखील केले. मात्र या मतदारसंघात कुणबी समाजाची लक्षणीय संख्या असल्याने पक्षाने कोहळे यांना संधी दिली. कोहळे २०१४ ते २०१९ या कालावधीत दक्षिण नागपुरचे आमदार होते व मागील निवडणूकीत त्यांना उमेदवारी न देता पक्ष संघटनेचे काम करण्याची सूचना देण्यात आली होती. उत्तर नागपुरात यावेळी भाजपकडून अनेक नावांची चर्चा होती. मात्र माने यांचा अनुभव लक्षात घेता पक्षाने सलग तिसऱ्यांदा त्यांचे नाव या मतदारसंघातून घोषित केले आहे.
सावनेरात केदार, काटोलमध्ये देशमुखांचे आव्हान
सावनेर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून कुणाला उमेदवारी जाहीर होते याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत होते. माजी मंत्री सुनिल केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना तेथून कॉंग्रेसने तिकीट दिले आहे. भाजपने तेथून आशीष देशमुख यांना उतरविले आहे. तर काटोलमधून भाजपने राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवार सलिल देशमुख यांच्याविरोधात चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. सलिल यांना वेळ संपल्याने सोमवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे आता काटोलचे दोन्ही प्रमुख उमेदवार एकाच दिवशी अर्ज भरणार आहेत. या दोन्ही मतदारसंघात प्रस्थापितांचे भाजपसमोर आव्हान राहणार आहे.
चर्चांना पूर्णविराम
लोकसभा निवडणूकांनंतर काही मतदारसंघात भाजपची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. त्यामुळे काही आमदारांचा पत्ता कट होतो की काय अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या यादीमुळे सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे.
अशा आहेत अकरा मतदारसंघातील प्रमुख लढती
मतदारसंघ महायुती महाविकासआघाडी
नागपूर दक्षिण-पश्चिम देवेंद्र फडणवीस (भाजप) प्रफुल्ल गुडधे (कॉंग्रेस)
नागपूर मध्य प्रवीण दटके (भाजप) बंटी शेळके (कॉंग्रेस)
नागपूर पूर्व कृष्णा खोपड़े (भाजप) दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी-शरद पवार)
नागपूर उत्तर डॉ. मिलिंद माने (भाजप) नितीन राऊत (कॉंग्रेस)
नागपूर दक्षिण मोहन मते (भाजप) गिरीश पांडव (कॉंग्रेस)
नागपूर पश्चिम सुधाकर कोहळे (भाजप) विकास ठाकरे (कॉंग्रेस)
हिंगणा समीर मेघे (भाजप) रमेश बंग (राष्ट्रवादी-शरद पवार)
सावनेर आशीष देशमुख (भाजप) अनुजा केदार (कॉंग्रेस)
रामटेक आशीष जयस्वाल (शिवसेना-शिंदे) विशाल बरबटे (शिवसेना-उद्धव ठाकरे)
कामठी चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) सुरेश भोयर (कॉंग्रेस)
काटोल चरणसिंग ठाकूर (भाजप) सलिल देशमुख (राष्ट्रवादी-शरद पवार)