अखेर नागपुरातील झाडे घेऊ लागली मोकळा श्वास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:35 PM2019-05-04T23:35:54+5:302019-05-04T23:37:41+5:30
सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरात ‘डी-चोकींग’च्या कामाला वेग आला आहे. अनेक झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी केल्याने झाडे आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्तअभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरात ‘डी-चोकींग’च्या कामाला वेग आला आहे. अनेक झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी केल्याने झाडे आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.
सिमेंट रस्त्यांची कामे करताना रस्त्यालगत असलेल्या बहुतांश झाडांच्या बुध्याभोवती कंत्राटदाराने सिमेंटचे आवरण केले होते. यामुळे झाडांना पाणी टाकता येत नव्हते. मुळांना पाणी मिळत नसल्याने झाडांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. अनेक झाडे मरणासन्न अवस्थेत यायला लागली होती. यासंदर्भात शहरात पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी संस्था ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने संस्थेचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अभिजित बांगर यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. नागपुरातील झाडांमुळे ‘ग्रीन सिटी’ म्हणून शहराची ओळख आहे. मात्र, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे ही ओळख मिटण्याची शक्यता निर्माण झाली होती.
सिमेंट काँक्रिटने झाडांचे बुंधे बांधल्या गेल्याने जमिनीखालील मुळांवर त्याचा परिणाम जाणवू लागला होता. याची दखल घेत आयुक्तांनी सर्व झोन आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. २३ मे पर्यंत ही सर्व झाडे मोकळी करण्यात यावी, झाडांच्या बुंध्यांच्या बाजूला ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे तांत्रिक सहकार्य घेऊन जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी आणि प्रत्येक सोमवारी याबबतचा अहवाल मांडण्यात यावा, असेही निर्देश दिले होते. त्यानुसार शहरातील सिमेंट रस्त्यांनी वेढलेल्या झाडांना मोकळे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. झाडांच्या बुंध्याभोवतीचे सिमेंट आवरण काढून झाडांचा बुंधा मोकळा करण्यात येत आहे.