अखेर येरखेड्यात स्वस्त धान्य दुकानासाठी मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:06+5:302021-09-02T04:17:06+5:30

कामठी : महिला बचतगटाला स्वस्त धान्य दुकानाच्या संचालनाची जबाबदारी देण्यासंदर्भात मंगळवारी येरखेडा येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. तीत ...

Finally voting for cheap grain shop in Yerkheda! | अखेर येरखेड्यात स्वस्त धान्य दुकानासाठी मतदान!

अखेर येरखेड्यात स्वस्त धान्य दुकानासाठी मतदान!

Next

कामठी : महिला बचतगटाला स्वस्त धान्य दुकानाच्या संचालनाची जबाबदारी देण्यासंदर्भात मंगळवारी येरखेडा येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. तीत महिला बचतगटाच्या निवडीच्या कार्यपद्धतीवर दोन गटात मतभेद असल्याने गोंधळ निर्माण झाला. शेवटी तालुका प्रशासनाने हस्तक्षेप करीत पोलीस बंदोबस्तात गुप्त मतदानाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवित सरपंच मंगला कारेमोरे यांनी यासंदर्भात कामठी पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

बचतगटांना स्वस्त धान्य दुकान संचालनाची जबाबदारी देण्यासंदर्भात येरखेडा येथील ग्रामपंचायत परिसरात सकाळी १० वाजताच्या दरम्यान सरपंच मंगला कारेमोरे यांच्या अध्यक्षतेत आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी स्वस्त धान्य दुकान मिळण्याकरिता जागृती महिला बचत गट, स्वप्नपूर्ती महिला बचत गट, मैत्रेय महिला बचत गट, महक महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, कल्पना फाऊंडेशन महिला बचत गट ,केशर स्वयंसहायता महिला बचत गट, अष्टविनायक महिला बचत गट व कल्पना स्वयंसहायता महिला बचत गटाने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले होते.

शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या महिला बचत गटांना दुकान वाटप करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. या आदेशाची अंमलबजावणीसाठी ही सभा बोलाविण्यात आली होती.

यावेळी ग्रामविकास अधिकारी जितेंद्र डवरे, नायब तहसीलदार आर. एच. ब्रह्मनोटे, पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. सभेत काही महिला बचत गटाच्या सदस्यांनी शासकीय नियमानुसार जो महिला बचत गट योग्य ठरेल त्यांना दुकान देण्याची मागणी केली. तर काही महिलांनी गुप्त मतदान घेऊन दुकान वाटप करण्याची मागणी केली. यावरून सभेत गोंधळ निर्माण झाल्याने सरपंच कारेमोरे यांनी सभा तहकूब केली. याच दरम्यान काही महिला बचत गटाच्या सदस्यांनी तहसीलदार अक्षय पोयाम यांना याबाबत कळविले. यानंतर तहसीलदार पोयाम यांनी येरखेडा येत दाखल झाले. तिथे सरपंच कारेमोरे आणि तहसीलदार पोयाम यांच्यात शासकीय नियमांवरून शाब्दिक चकमक झाली. दरम्यान तहसीलदारांनी राजकीय दबावात येऊन आपला अपमान केला असा आरोप कारेमोरे यांनी तक्रारीत केला आहे. यानंतर येथे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात गुप्त मतदान पद्धतीने मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची प्रक्रिया रात्री साडेसात वाजेपर्यंत सुरू होती. त्याच दरम्यान मुसळधार पाऊस आल्याने काही बचत गटांच्या महिलांची धावपळ झाली. त्या मतदानापासून वंचित राहिल्या. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तालुका प्रशासन याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करणार आहे.

---

बचत गटांना स्वस्त धान्य दुकान संचालनाची जबाबदारी देण्यासंदर्भात येरखेडा येथे शासकीय नियमानुसार प्रक्रिया राबविण्यात आली. कोणत्याही राजकीय दबावाला न पडता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील.

अक्षय पोयाम, तहसीलदार, कामठी

Web Title: Finally voting for cheap grain shop in Yerkheda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.