अखेर जाग आली
By admin | Published: July 26, 2014 02:58 AM2014-07-26T02:58:22+5:302014-07-26T02:58:22+5:30
रस्त्यांवरील डांबर उघडून बारीक गिट्टी
रस्त्यांवरील गिट्टी साफ करण्यास सुरुवात : कामाची चौकशी करा
नागपूर : रस्त्यांवरील डांबर उघडून बारीक गिट्टी रस्त्यावर साचली आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन जागे झाले. शुक्रवारी रस्त्यांवरील गिट्टी साफ करण्यास सुरुवात करण्यात आली. सदर येथील माऊंट रोडवरील रस्त्यापासून याची सुरुवात झाली. दरम्यान रस्त्यांच्या बांधकामातील गुणवत्ता चव्हाट्यावर आल्याने शहरातील नागरिकांनी यासंबंधात आवाज उचलला असून रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शहरातील रस्ते वर्षभरापूर्वीच बांधण्यात आले. काही रस्ते तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आले होते. परंतु या रस्त्यांची गुणवत्ता पावसानेच ठरवली. तीन दिवसाच्या पावसात या रस्त्यांची धुळधाण झाली. ज्या रस्त्याने वाहन चालकांना आपली वाहने चालविण्यात आनंद वाटायचा त्याच रस्त्यांवरून आज वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. गिट्टीखदान चौक ते सीपीडब्ल्यूडी कॉलनी, अनंतनगर, जाफरनगर, मानेवाडा चौक ते तुकडोजी पुतळा, जाटतरोडी चौक ते मेडिकल चौक, लोकांची शाळा ते रेशीमबाग चौक, अजनी पोलीस स्टेशन ते तुकडोजी पुतळा, मोक्षधाम ते ग्रेट नागरोड, वर्धा रोडवरील हॉटेल प्राईड ते उड्डाण पूल, महाराज बाग चौक ते आकाशवाणी चौक, प्रतापनगर, लक्ष्मीनगर दीक्षाभूमी, व्हेरायटी चौक ते वाडी, नीरी ते सुरेंद्रनगर, आरपीटीएस आदींसह शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची हीच अवस्था आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही आता पुढे आले असून यासंबंधात आवाज उचलत आहेत. जनतेच्या कररूपी पैशातून हे रस्ते तयार झाले असून शहरातील याच रस्त्यांसाठी प्रत्येक वाहनचालकाकडून रोड टॅक्सचे व्यतिरिक्त डिझेल व पेट्रोलवर १ रुपया प्रतिलिटर सेस वसूल केला जात आहे. शहरातील याच रस्त्यांसाठी चारचाकी वाहनचालकांकडून टोलटॅक्स वसुलणे अजूनही सुरू आहे. सर्वच रस्त्यांसाठी नागपूरकरांकडून पैसा वसूल करण्यात येत असेल तर योग्य गुणवत्तेचे रस्ते बनविणे ही मनपाची जबाबदारी आहे, त्यामुळे मनपाने याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान शुक्रवारपासून रस्त्यांवर पसरलेली गिट्टी साफ करण्याच्या कामाला सुरुवात झाली खरी परंतु ती केवळ काही विशिष्ट रस्त्यांपुरतीच मर्यादित होती. शहरातील बहुतांश रस्त्यांची परिस्थिती अजूनही तशीच आहे. त्याकडे महापालिका कधी लक्ष देणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
माकपाचे मनपा आयुक्तांना निवेदन
तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे नागपुरातील रस्त्यांवरील वरचा खडीचा थर उखडून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या रस्त्यांच्या बांधकामाला जबाबदार असलेले ठेकेदार व मनपा अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केली असून यासंबंधीचे निवेदन शुक्रवारी पक्षाच्यावतीने मनपा आयुक्त श्याम वर्धने यांना सादर करण्यात आले आहे.
ंआरटीओचे बांधकाम विभागाला पत्र
‘लोकमत’ने शुक्रवारी प्रकाशित केलेले ‘धुळीत नागपूर’ याची दखल प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरनेही घेतली. कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले, शहरातील अनेक रस्ते उखडल्याने बारीक गिट्टीचा खच जमा झाला आहे. यामुळे वाहनाचा ब्रेक लागण्यास उशीर होतो. अनेक वाहनधारक यामुळे घसरून पडत असल्याची, तर काही अपघात झाल्याची माहिती येत आहे. परिणामी कार्यालयाच्यावतीने बांधकाम विभागासह संबंधित कार्यालयांना याची दखल घेण्याचे पत्र देण्यात येणार आहे.
कंत्राटदारांना पोसण्याचा प्रयत्न
शहरातील रस्त्यांच्या बांधकामाची गुणवत्ता ही अतिशय निकृष्ट होती. त्यामुळे एकाच पावसात रस्त्यांची ही दुरवस्था झाली आहे. नीरी ते आरपीटीएस दरम्यानचा रस्ता तर अतिशय खराब झाला आहे. पुन्हा रस्ता व्यवस्थित केला जाईल. त्यासाठी पुन्हा पैसा खर्च होईल. एकूणच हा सर्व कंत्राटदारांना पोसण्याचाच प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुरेंद्रनगर आरपीटीएस येथील ज्येष्ठ नागरिक आर.बी. मांगे यांनी दिली आहे.