चिमुकल्या जहानाची कोरोना प्रभावित नागरिकांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:38+5:302021-06-03T04:07:38+5:30
मेहा शर्मा नागपूर : जहाना वली या आठ वर्षीय चिमुकलीने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ही चिमुकली टी-शर्ट रंगविण्याच्या कलेतून ...
मेहा शर्मा
नागपूर : जहाना वली या आठ वर्षीय चिमुकलीने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ही चिमुकली टी-शर्ट रंगविण्याच्या कलेतून मिळविलेली रक्कम कोरोना प्रभावित नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना दान करीत आहे. तिने सामाजिक संस्थांना आतापर्यंत हजारो रुपये दान दिले आहेत.
जहानाने ही कला दोन वर्षांपूर्वी उन्हाळी शिबिरामध्ये आत्मसात केली. काही महिन्यांनंतर तिची या कलेकडे ओढ वाढली. ती त्यात अधिक रुची घ्यायला लागली. त्यामुळे तिला पालकांनीही प्रोत्साहन दिले. त्यासाठी तिला पेंट व इतर साहित्य उपलब्ध करून दिले. जहानाने लगेच टी-शर्टना कलात्मकरीत्या रंगवणे सुरू केले व त्या टी-शर्टस् कुटुंबातील सदस्यांना भेट दिल्या. पुढे ती आणखी चांगले काम करायला लागली. त्यामुळे तिची आई निहारिका चुग वली यांनी या कलेचे ‘जेज कलर-पॉप आर्ट शॉप’ हे इन्स्टाग्राम पेज तयार केले, तसेच जहानाने रंगविलेल्या टी-शर्टची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अनेकांनी टी-शर्ट खरेदी केले. त्यातून उभी झालेली रक्कम कुठे खर्च करायची याचा विचार करीत असताना, जहाना व तिच्या पालकांनी ही रक्कम कोरोना प्रभावित नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १५ मे रोजी सेवा किचन संस्थेला १८ हजार रुपयाचे पहिले आर्थिक दान करण्यात आले. या महिन्यात दानाची रक्कम दुप्पट झाली आहे. जहानाने ६५ टी-शर्टही तयार करून ठेवले आहेत. त्यामुळे आणखी रक्कम उभी होणार आहे. गेल्या आठवड्यात दानवीर उपक्रमाला १५ हजार रुपये देण्यात आले. या संदर्भात बोलताना जहानाने समाजाची सेवा करणे आवडत असल्याचे सांगितले, तसेच पुढे शक्य होईल, तेवढे दिवस रक्कम दान करीत राहील, असेही ती म्हणाली.