ऑटोचालकांना १५०० रुपये आर्थिक साहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:07 AM2021-05-23T04:07:12+5:302021-05-23T04:07:12+5:30
नागपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे ऑटोरिक्षा चालकांना प्रवासी मिळणे कठीण झाल्याने, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण ...
नागपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे ऑटोरिक्षा चालकांना प्रवासी मिळणे कठीण झाल्याने, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपयाचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी उद्या रविवार २३ मेपासून होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यास थेट खात्यात रक्कम जमा होणार आहे.
नागपूर शहरात १५ ते १६ हजार परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. राज्याकडून प्राप्त होणाऱ्या आर्थिक साहाय्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी नुकतीच शहर आरटीओ कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नेवस्कर यांनी ऑटोरिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती दिली. यावेळी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर, राजू इंगळे, प्रिन्स इंगोले, टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख, प्रकाश साखरे, सय्यद रिजवान, अशोक न्यायखोर, अब्दुल्ला पठाण, एजाज शेख, सलीम शेख, अब्दुल आसिफ यांच्यासह ऑटोरिक्षा चालक उपस्थित होते.
- असा करता येईल अर्ज
परिवहन विभागाने विकसित केलेल्या या प्रणालीची माहिती ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येथे वाहन क्रमांक, वाहन परवाना क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती भरल्यानंतर, पडताळणी होऊन रिक्षाचालकांच्या खात्यात तात्काळ दीड हजाराची एकवेळची आर्थिक मदत जमा होणार आहे. परिवहन विभागाने यासंदर्भातील तयारी पूर्ण केली आहे. ऑटोरिक्षाधारकाला मात्र यासाठी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावे लागणार आहे. विशेष म्हणजे, ही योजना २२ मेपासून सुरू होणार होती. आरटीओ अधिकाऱ्यांच्यानुसार, शनिवारी रात्री यासंदर्भातील ‘लिंक ओपन’ होईल. परंतु रविवारीच याची प्रक्रिया पूर्ण होईल.