हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची आर्थिक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:28 PM2020-06-03T22:28:08+5:302020-06-04T01:13:24+5:30
नागपूरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५ दिवसांपासून बंद असल्याने उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरू होत असताना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५ दिवसांपासून बंद असल्याने उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरू होत असताना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
उत्पन्न नसल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, वीज आणि अन्य देखभाल खर्च करताना महत प्रयत्न करावे लागत आहे. भविष्यात हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतरही दैनंदिन खर्च, सुरक्षा व सॅनिटायझेशनचा अतिरिक्त खर्च, कच्च्या मालाची उपलब्धता, कामगारांचा तुटवडा आदींसह अनेक आव्हानामुळे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार का, अशी चिंता व्यावसायिकांना सतावत आहे. हॉटेलचालक, व्यवस्थापक, वेटर, आचारी, स्वच्छता कर्मचारी, भाजीपाला पुरवठादार असे अनेक घटक या क्षेत्रावर अवलंबून आहेत.
मार्च महिन्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणी पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. राज्य आणि केंद्र सरकारतर्फे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद करण्यात आले. बँकांच्या कर्जाचे हप्ते, जागेचे भाडे, कामगारांचा पगार, वीज बिल आदींच्या खर्चामुळे हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. नियम आणि अटींच्या आधारे हॉटेल व रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
व्यावसायिकांसमोर वर्षभर आर्थिक अडचणी राहणार
ग्राहकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. शासनाच्या शाश्वतीनंतरच हॉटेल व्यवसाय सुरळीत होणार आहे. ग्राहकांमध्ये स्वच्छतेचा विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. त्याकरिता हॉटेल्स व रेस्टॉरंटचे वारंवार सॅनिटायझेशन, कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी, वेटरला मास्क व हॅन्डग्लोव्हज उपलब्ध करून द्यावे लागतील. कामगार स्वगृही परतल्याने तुटवडा भासणार आहे. दैनंदिन खर्चही अडचणीचा ठरणार आहे. पुढचे एक वर्ष व्यावसायिकांसाठी अडचणीचे ठरणार आहे.
हॉटेल्स व लॉज सुरू करण्याची मागणी
अन्य जिल्ह्यातून येणारे प्रवासी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हॉटेल्स आणि लॉज सुरू करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे करणार आहे. याबाबत एक निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना देणार आहे. संपूर्ण जून महिना हॉटेल्स व लॉज बंद राहणार आहेत. ते लवकरच सुरू होऊन आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत.
तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन.