मेडिकलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राटदाराकडून आर्थिक शोषण
By गणेश हुड | Published: May 13, 2024 08:14 PM2024-05-13T20:14:35+5:302024-05-13T20:14:50+5:30
संघटनेचा आरोप : १०८ सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार : बुधवारपासून आंदोलन.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यासाठी १५ मे पासून मेडिकल रुग्णालयापुढे धरणे आंदोलन करण्याचा इशारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी भारतीय मजूदर महासंघाचे प्रदेश महामंत्री गजानन गदलेवार, कंत्राटी कर्मचारी संघाच्या सचिव प्रिती मेश्राम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मेडिकलमध्ये मागील १० ते १२ वर्षापासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला सहा ते सात हजार रुपये वेतन देवून कंत्राटदार व व्यवस्थापनाकडून त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण सुरु आहे. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. दुसरीकडे मेडिकलमध्ये ५८० पदासाठी भरती प्रक्रीया राबवली जात आहे. यात या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार समावून घेण्याची संघटनेने मागणी केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार मेडिकलच्या सेवेत समावून घेण्याचे निर्देश मेडिकल प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यात आली. परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही. अशी माहिती मुन्ना यादव यांनी दिली.
१०८ सुरक्षा रक्षक बेरोजगार
१ मे रोजी मेडिकल रुग्णालयात १०८ खासगी सुरक्षा रक्षकांना कामारुन कमी करून त्यांचा रोजगार हिरावला आहे. सुरक्षा रक्षकांना कोणतीही नोटीस व कारण न देता या सुरक्षा रक्षकांची सेवा समाप्त केली आहे. १२ वर्षांपूर्वी फक्त ४ हजार ४०० रुपये मासिक वेतनावर १०८ कर्मचारी रुजू झाले होते. आता ६ हजार रुपये मासिक वेतन त्यांना मिळत होते. हे सुरक्षारक्षक सेवेत असलेल्या ‘युनिटी सेक्युरिटी फोर्स’ या खासगी एजन्सीकडून किमान वेतनानुसारही वेतन दिले जात नव्हते. असा आरोप संघटनेने केला.