लग्नकार्य रद्द झाल्याने व्हेंडर्सला आर्थिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:50+5:302021-06-21T04:07:50+5:30
नागपूर : लॉकडाऊनमध्ये लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश असल्याने जवळपास ६० टक्के कुटुंबीयांनी लग्न रद्द केले. काही जणांनी ...
नागपूर : लॉकडाऊनमध्ये लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश असल्याने जवळपास ६० टक्के कुटुंबीयांनी लग्न रद्द केले. काही जणांनी बऱ्याच दिवसांपासून जुळलेले लग्नकार्य कोरोना काळात कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत घरीच केले तर काहींनी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलले. त्यामुळे लग्नकार्यावर अवलंबुन असणाऱ्या अनेक व्हेंडर्सला कोट्यवधींचे आर्थिक नुकसान सोसावे लागले. लग्न रद्द केल्याने वा पुढे ढकलल्याने व्हेंडर्सचे ऑर्डर रद्द झाले.
लॉकडाऊनपूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ झाले होते. पण लॉकडाऊनच्या काळात सर्वच कार्य बंद होते. पण आता लॉकडाऊन हटल्यानंतर १०० जणांच्या उपस्थितीत लग्नकार्याला परवानगी मिळाली असून १५ जुलैपर्यंत लग्नकार्य होणार आहेत. त्यामुळे व्हेंडर्स अर्थात कॅटरर्स, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, मंडप डेकोरेटर्स, फूल व लायटिंग सजावट, आचारी, ब्रॅण्ड आदींसह लग्नकार्याशी जुळलेले ४० व्हेंडर्स सक्रिय झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी जुळवून ठेवण्याची मोठी जबाबदारी होती. त्यावेळी तोटा सहन करावा लागला. पण आताही कमी लोकांसाठी नफा ना तोटा या तत्त्वावर काम करावे लागत असल्याचे इव्हेंट मॅनेजर गोपाल अग्रवाल यांनी सांगितले.
राहुल कॅटरर्सचे चंद्रकांत खंगार म्हणाले, गेल्यावर्षीपासून कॅटरर्सचा व्यवसाय तोट्यात आहे. आम्हाला तोटा झाला तरीही कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली. सध्या लग्न सुरू झाले, पण पाहुण्यांच्या संख्येवर बंधन असल्याने ऑर्डरवर परिणाम झाला आहे. कोरोनाने या व्यवसायाची कंबर तुटली आहे.
अॅडमार्क इव्हेंटचे प्रमोद बत्रा म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून लग्न आणि अन्य कार्यक्रमाचे आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून केले जातात. पण प्रशासनाने उपस्थितांच्या संख्येवर बंधने टाकल्याने कंपनीला काम मिळत नाही. नागपुरात लहानमोठे १०० पेक्षा जास्त इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आहेत. सरकारने त्यांचे आयोजन या कंपन्यांच्या माध्यमातून करावे. त्यामुळे कंपनीला काम आणि कर्मचाऱ्यांना रोजगार मिळेल. या अन्य राज्यातही या कंपन्यांना काम मिळते. पण कोरोनामुळे सर्वच व्यवसायावर पाणी फेरल्या गेल्या आहे. कर्मचारी टिकवून ठेवणे कठीण झाले आहे.