नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आर्थिक गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:14 AM2019-03-04T10:14:26+5:302019-03-04T10:15:55+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला मोठा धक्का बसला आहे. परीक्षा विभागातील गोपनीय विभागातील आर्थिक गोलमाल समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला मोठा धक्का बसला आहे. परीक्षा विभागातील गोपनीय विभागातील आर्थिक गोलमाल समोर आला आहे. उन्हाळी परीक्षांसाठी पेपर ‘सेट’ करायला येणाऱ्या परीक्षकांना देण्यात येणारी लाखो रुपयांची रक्कम गायब झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ही रक्कम अनेक लाखांची नसून एक लाखाच्या जवळपास असल्याचा दावा परीक्षा विभागातील सूत्रांनी केला आहे. आता या रकमेची चोरी झाली आहे की हिशेबात काही गडबड झाली आहे, याचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.
नागपूर विद्यापीठात सद्यस्थितीत उन्हाळी परीक्षांचे काम सुरू आहे. परीक्षांचे पेपर ‘सेट’ करण्यासाठी नागपुरातून तसेच नागपूरबाहेरून दररोज परीक्षक परीक्षा भवनात येत आहेत. नियमांनुसार एक पेपर ‘सेट’ करण्यासाठी परीक्षकांना ३५० रुपयांचे मानधन तसेच १०० रुपयांपर्यंत ‘कन्व्हेनन्स’ देण्यात येतो. ही रक्कम साधारणत: रोख स्वरूपात असते. यासाठी विद्यापीठाकडून गोपनीय विभागाला सुमारे १० लाखांपर्यंतचा अग्रीम निधी देण्यात येतो. दोन धनादेशांत ही रक्कम देण्यात येते व गोपनीय विभागाकडून ‘क्लर्क’ दोन दोन लाख रुपये त्यातून काढतो व त्या निधीचा वापर करण्यात येतो. परीक्षकांना दिलेल्या निधीचा नियमितपणे हिशेब ठेवण्यात येतो. गुरुवारी परीक्षा विभागातील लिपिक नेहमीप्रमाणे सायंकाळी कुलूप लावून गेला. शुक्रवारी कुलूप उघडल्यावर रक्कम तपासली असता त्यात एक लाख रुपयाहून अधिक रक्कम नसल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर गोपनीय विभागातील अधिकारी हादरले व त्यानंतर पैशांची हेराफेरी झाली की काय, या दिशेने चाचपणी होण्यास सुरुवात झाली.
अद्याप लेखी माहिती नाही
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता, असा कुठलाही प्रकार झाल्याची लेखी तक्रार किंवा माहिती आमच्याकडे कुठल्याही कर्मचारी, विभागाकडून आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केली. जर तक्रार आली तर आम्ही तातडीने चौकशी करू; शिवाय आमच्या पातळीवर असा काही प्रकार झाला आहे का याची चौकशी करु, असे त्यांनी स्पष्ट केले.
चोरी की हिशेबात गडबड?
परीक्षा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी बाहेरील कुठल्या व्यक्तीने येऊन चोरी केल्याचे निदर्शनास आलेले नाही. कुलूप तुटलेले नव्हते. अनेक वर्षांपासून इथे हिशेबात गडबडीचादेखील कुठलाही प्रकार घडला नाही. त्यामुळे अचानक नेमका घोटाळा झाला, ही आश्चर्याची बाब आहे. जर चोरी झाली नसेल व हिशेबात गडबड असेल तर निश्चितपणे विद्यापीठाला चौकशी करावीच लागेल. नेमकी किती रक्कम गायब आहे. मंगळवारीच समोर येईल. संबंधित कर्मचाऱ्यांकडून हिशेब लागत नसल्यास ती रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी लागेल, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.