जगण्याच्या उमेदीला हवेय आर्थिक पाठबळ
By admin | Published: January 4, 2016 05:14 AM2016-01-04T05:14:15+5:302016-01-04T05:14:15+5:30
जबलपूरच्या सकरा येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत सफाई कामगार असलेल्या रामबाबू विदेसीराम महतो यांचा
जबलपूरच्या रामबाबू महतो यांच्या पत्नीची आर्त हाक : दानदात्यांच्या मदतीवरच जीवन अवलंबून
नागपूर : जबलपूरच्या सकरा येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत सफाई कामगार असलेल्या रामबाबू विदेसीराम महतो यांचा मागील महिन्यात एक मोठा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते कोमात गेले. जबलपूरच्या रुग्णालयात त्यांना एक महिना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्यांना नागपुरात हलविण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यापासून ते नागपुरातील सीम्स हॉस्पीटलमध्ये भरती आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे पण या गरीब कुटुंबाजवळचे सारेच आता संपले आहे. महतो यांच्या जगण्याच्या उमेदीला आता समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.
जबलपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती असताना त्यांच्यावरच्या उपचारासाठी आठ लाख रुपये खर्च झाले. बँक आॅफ महाराष्ट्रने काढलेल्या आरोग्य विम्याचे तीन लाख आणि पत्नी मधुबाला हिने सारे दागिने विकून उपचारांचा खर्च केला. त्यानंतर नागपुरातील सीम्स हॉस्पीटल, बजाजनगर येथे त्यांना आणण्यात आले. पण मधुबाला यांच्याजवळ उपचारांसाठी पैसा नाही. अशा प्रतिकुलतेत त्यांच्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्रच्या एससी, एसटी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव आनंद रहाटे धावून आले. महतो यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्या उपचाराला प्रतिसादही मिळतो आहे. उपचारांनी ते चांगले होण्याची शक्यता डॉक्टरांनीही वर्तविली आहे. त्यामुळे महतो यांच्या पत्नीची उमेद जागली. पण त्यांच्यावर किमान १५ दिवस उपचारांची गरज असून प्रत्येक दिवसाच्या उपचाराचा खर्च ३५ हजार आहे. आनंद रहाटे यांनी बँकेशी संपर्क साधून बँकेकडून १ लाख ७५ हजार रुपयांची मदत मिळवून दिली. एससी, एसटी असोसिएशनच्या सदस्यांकडूनही एक लाख रुपयांची मदत निर्माण केली. पण अजूनही सात ते आठ लाखांचा निधी उपचाराला लागणार आहे. अखेर आनंद रहाटे यांनी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी पेंढारकर यांना मदत मिळेपर्यंत मुदत देण्याची विनंती केली. त्यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे. महतो यांच्या दोन मुली १० वी आणि १२ वी ला आहे.
एक मुलगा आहे. आतापर्यंत दागिने आणि सारेच विकून उपचार केला. त्यांचे नागपुरात कुणीही नाही. महतो यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्यावर उपचार झाले तर ते चांगले होऊ शकतात आणि एका कुटुंबाचे छत्र वाचू शकते. मधुबाला आपल्या पतीच्या उपचारांसाठी हतबल झाल्या आहेत. प्रत्येकाने शक्य ती आर्थिक मदत केली तर महतो यांचा जीव वाचू शकतो. यासाठी त्यांनी लोकमतकडे आर्त विनंती केली आहे. केवळ पैशांसाठी त्यांचा उपचार थांबला तर... तो थांबू नये आणि ते चांगले व्हावेत म्हणून समाजाने मदत करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दानदात्यांनी आपली मदत मधुबाला रामबाबू महतो, बँक आॅफ महाराष्ट्र, यांचे खाते क्रमांक ६०२२२३४९९८४ यात करावी. बँकेचा आयएफएससी कोड एमएएचबी ००००३४१ हा आहे. महतो यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन मधुबाला यांच्यासह बँक आॅफ महाराष्ट्र, धरमपेठ शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक आनंद रहाटे यांनी केले आहे. मधुबाला यांचा मोबाईल क्रमांक ७३८९१२८९५८ हा आहे. (प्रतिनिधी)