कर्जबाजारी एसटीला हवाय आर्थिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 09:48 AM2020-09-08T09:48:29+5:302020-09-08T09:50:21+5:30
एसटीला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी तातडीने ३ हजार कोटींची गरज असून पावसाळी अधिवेशनात एसटीला तातडीने ही रक्कम देण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दयानंद पाईकराव
नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाल्यामुळे एसटी महामंडळ चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर माल वाहतूक, खासगी गाड्यांचे टायर रिमोल्ड करून एसटीने उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. अलीकडेच एसटी बसेसची आंतरजिल्हा वाहतूक सुरु झाली आहे. परंतु एसटी महामंडळाला अनेक बाबींची रक्कम द्यावयाची असून एसटी अद्यापही कर्ज बाजारी आहे. एसटीला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी तातडीने ३ हजार कोटींची गरज असून पावसाळी अधिवेशनात एसटीला तातडीने ही रक्कम देण्याची मागणी करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या बसेस लॉकडाऊनच्या काळात बंद होत्या. कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे, असा प्रश्न महामंडळासमोर उभा झाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे विविध सवलतींची असलेली रक्कम मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले. परंतु थातुरमातुर उपाययोजना करून काहीच अर्थ नसून एसटी महामंडळाला सक्षम करण्यासाठी तातडीने ३ हजार कोटी देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)ने मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सध्या एसटी महामंडळाला डिझेलचे जवळपास २५ कोटी देणे आहे. एसटीने खरेदी केलेल्या चेसीसचे पेसे, जुन्या कंत्राटदारांचे पेसे तसेच जुले आणि ऑगस्टच्या वेतनासाठी आणखी ५०० कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे एसटीला तातडीने ३ हजार कोटी रुपये दिल्यास एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती पूर्व पदावर येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटीच प्रवासाचे स्वस्त आणि सुरक्षित माध्यम आहे. त्यामुळे शासनाने एसटीला आर्थिक मदत केल्यास सर्व सामान्यांची लालपरी स्पर्धेच्या युगात टिकणार आहे.
तातडीने आर्थिक मदतीची गरज
‘इतर राज्याप्रमाणे शासनाने एसटी महामंडळाला अर्थसाहाय्य देण्यासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. एसटीची आर्थिक स्थिती समजून महाराष्ट्र शासनाने तातडीने एसटीला ३ हजार कोटी द्यावेत.’
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)