आधारसाठी विद्यार्थ्यांवर आर्थिक भार
By admin | Published: August 25, 2015 03:40 AM2015-08-25T03:40:26+5:302015-08-25T03:40:26+5:30
बोगस पटसंख्या दाखवून अनुदान लाटण्याऱ्या शाळांना पायबंद घालण्यासाठी शासनाने सरल ही डाटाबेस प्रणाली
नागपूर : बोगस पटसंख्या दाखवून अनुदान लाटण्याऱ्या शाळांना पायबंद घालण्यासाठी शासनाने सरल ही डाटाबेस प्रणाली अस्तित्वात आणली. यात विद्यार्थ्यांची माहिती शाळांना आॅनलाईन भरायची आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आवश्यक आहे. ग्रामीण भागात ५० टक्के विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड नाही. ग्रामीण भागात महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून आधार कार्ड बनवून मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत केंद्र मोजकेच असल्याने, विद्यार्थ्यांच्या गरजेपोटी व पालकांच्या अज्ञानामुळे आधारसाठी आर्थिक भार बसतो आहे.
नागपूर जिल्ह्यात ४००० हजार शाळेतील ९ लाख विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून, सरलमध्ये भरायची आहे. शासनाने १५ आॅगस्टपर्यंत शाळांना माहिती भरण्याचे टार्गेट दिले होते. मात्र वेबसाईटच्या अडचणी व विद्यार्थ्यांकडून माहितीची वेळेत पूर्तता झाली नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ९ ते ११ या कालावधीत नागपूर विभागासाठी वेबसाईट सुरू राहणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांचा डाटा शाळांना भरावयाचा आहे. यापूर्वी सरलमध्ये विद्यार्थ्यांचे रक्तगट, उत्पन्नाचा दाखला, कुटुंबाची माहिती भरायची होती. आता या अटी शिथिल केल्या असून, फक्त आधार कार्डचा नंबर सरलमध्ये भरावयाचा आहे. सध्या तरी जिल्हा परिषदेकडे ४०,००० विद्यार्थ्यांची नोंदणी सरलमध्ये झाल्याची माहिती आहे. सरलमध्ये आधारकार्डच्या नंबरशिवाय नोंद होत नाही. परंतु ग्रामीण भागात ५० टक्के विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड नाहीत. ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर महा ई सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र आदी दाखले मिळतात. आधार कार्डसुद्धा येथे काढण्यात येते. आधार कार्डसाठी कुठलेही शुल्क आकारता येत नाही. मात्र विद्यार्थ्यांची आधारसाठी होत असलेली गर्दी लक्षात घेऊन या केंद्रात आधारसाठी पैसे मोजावे लागत आहे. २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. पालकांचे अज्ञान व विद्यार्थ्यांची गरज असल्याने पैसे देणे भाग पडत आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांपर्यंत आधार केंद्र पोहोचावे
आधारकार्डशिवाय सरलमध्ये नोंद होत नाही. विद्यार्थ्यांना सक्ती केल्यास विद्यार्थी शाळेत अनुपस्थित राहतात. दुसरीकडे आधारच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे. हा शासनाचा कार्यक्रम असून, शासनाने विद्यार्थ्यांपर्यंत आधारची प्रक्रिया पोहोचावी. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढावे.
-पुरुषोत्तम पंचभाई, सरकार्यवाह, विदर्भ शिक्षक संघ
४० हजार विद्यार्थ्यांमागे ३ आधार केंद्र
संपूर्ण मौदा तालुक्यात केवळ ३ महा ई सेवा केंद्र आहे. मौदा तालुक्यात जवळपास ४० हजारावर विद्यार्थी आहेत. शाळांनी आधारची सक्ती केल्याने या तीन केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांकडून आधारसाठी पैसे वसूल केले जात आहे.
-शकुंतला हटवार, सदस्य, जि.प.
विद्यार्थ्यांची लूट होऊ देणार नाही
प्रत्येक तालुक्यात महा ई सेवा केंद्र वाढविल्याशिवाय विद्यार्थ्यांची लूट थांबणार नाही. वेळेच्या आत विद्यार्थ्यांना आधार कार्ड हवे असल्याने आधार केंद्र प्रत्येक केंद्र शाळेत सुरू करावे लागणार आहे.त्यासाठी पुढाकार आवश्यक आहे. यासाठीच मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
-उकेश चव्हाण,
शिक्षण सभापती, जि.प.