टायगर गॅप झोपडपट्टीवासीयांसाठी जागा शोधा
By Admin | Published: March 9, 2016 03:25 AM2016-03-09T03:25:55+5:302016-03-09T03:25:55+5:30
टायगर गॅप झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी १५ दिवसात शासकीय जागेचा शोध घेऊन परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : प्रस्ताव सादर करावा
नागपूर : टायगर गॅप झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी १५ दिवसात शासकीय जागेचा शोध घेऊन परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
या झोपडपट्टीतील आदिवासींना हजारी पहाड येथील म्हाडाच्या जमिनीवर पुनर्वसन करण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, प्रा. अनिल सोले आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.
१७३ झोपडपट्टीवासी आदिवासींची यादी तयार आहे. ही यादी म्हाडाला दिल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानुसार टॉयगर गॅपच्या जागेवरून आदिवासींना उठविण्यात आले. तेव्हाच न्यायालयाने शासकीय जागेवर त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश दिले होते. पण पुनर्वसन अजून झाले नाही. त्यावेळी हजारी पहाड येथे म्हाडाची जागा आहे. त्या जागेवर पुनर्वसन होऊ शकते, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले होते. याकडे आमदार देशमुख यांनी लक्ष वेधले. ही झोपडपट्टी उठवण्यासंदर्भातील आंदोलनात आपण स्वत: सहभागी झालो होतो, असे आमदार प्रकाश गजभिये म्हणाले.
म्हाडाच्या घरकुल योजनेत या आदिवासींसाठी १७३ घरकुले राखीव ठेवा, असा पर्यायही बैठकीत आला. पण म्हाडा मोफत घरे देऊ शकत नाही. या घरकुलाची किंमत ७.५० लाख आहे. तसेच आदिवासी गरीब असल्याने ते ही किंमत देऊ शकत नाही त्यामुळे म्हाडाच्या योजनेत हे पुनर्वसन होऊ शकत नाही. यावर पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, १५ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांनी आमदारांना सोबत घेऊन शासकीय जागेचा शोध घ्यावा व एक पुनर्वसनाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवावा. दरम्यान आदिवासींना शासकीय जागांचे पट्टे द्यावे, अशी मागणीही आमदार देशमुख यांनी केली.(प्रतिनिधी)