ईश्वराला फार झाले शोधणे... माणसाचा शोध घे रे माणसा

By Admin | Published: February 15, 2016 03:01 AM2016-02-15T03:01:51+5:302016-02-15T03:01:51+5:30

भौतिक सुखात हरविलेला माणूस मन:शांतीसाठी मंदिर, मशिदीत ईश्वराचा शोध घेताना दिसतो.

Finding God very much ... searching for a man | ईश्वराला फार झाले शोधणे... माणसाचा शोध घे रे माणसा

ईश्वराला फार झाले शोधणे... माणसाचा शोध घे रे माणसा

googlenewsNext

गझलनवाज भीमराव पांचाळेंचे सादरीकरण : भावपूर्ण गझलांचा नजराणा
नागपूर : भौतिक सुखात हरविलेला माणूस मन:शांतीसाठी मंदिर, मशिदीत ईश्वराचा शोध घेताना दिसतो. ईश्वराला मंदिरात शोधण्याची प्रवृत्ती अनादिकाळापासून आहे. पण खरा ईश्वर माणसातच आहे, हेच तो विसरत चालला आहे. ईश्वराचा शोध घेण्यात हरविलेल्या माणसाला गझलनवाज भीमराव पांचाळेंनी आपल्या खास अंदाजात ‘ईश्वराला फार झाले शोधणे...माणसाचा शोध घेरे माणसा’ अशा ओळींनी विचारप्रवृत्त केले.
प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात भीमराव पांचाळे यांच्या गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भावपूर्ण गझलांनी भीमरावांनी उपस्थितांच्या टाळ्यांसह त्यांच्या मनातही घर केले. ‘वाचलेली, ऐकलेली माणसे कुठे गेली? पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे? ’ या इलाही जमादार यांच्या गझलेने माणसाच्या स्वभावगुणांचा वेध घेतला. माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता, कोणत्या काळात सांगा सभ्य होती माणसे? असे प्रश्न विचारत इलाही जमादार यांनी लिहिलेल्या अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा असे शेर सादर करून भीमरावजींनी रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. गझल सादर करताना वृक्षसंवर्धनाचा संदेश देत ते म्हणाले की, तोडाल वृक्ष जेव्हा ध्यानात हे असू द्या, कित्येक पाखरांचा तो आरसा असावा.मराठी गझल सातासमुद्रापार घेऊन जाणारे भीमराव पांचाळे यांनी मराठी गझलच्या विविध छटा उलगडून दाखविल्या. १२०० वर्षांपूर्वी आमीर खुसरो यांनी उर्दू आणि पारसी भाषेचा अतिशय खुबीने वापर करून गझल लिहिली. त्याचा एक शेर उर्दू तर दुसरा पारसी भाषेत लिहिला होता, तरीसुद्धा दोन्ही भाषेचा गोडवा कायम होता. हा प्रयोग मराठी भाषेत पहिल्यांदा करण्यात आला, अशी आठवण सांगून भीमरावांनी मराठी व उर्दू भाषेचा संगम असणारी अप्रतिम गझल सादर केली. ऐ सनम आंखों को मेरी खूबसुरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे, ऐ खुदा मै चाहता हूं, हर कोई चाहे मुझे, गंध दे मजला फुलांचा हसणे निर्वाज्य दे. आमीर खुसरो नंतरच्या मराठीतील प्रयोगाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली.
जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. हे सांगत जीवनाचे वर्णन करताना ते म्हणाले की, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही. हिंडलो सुख शोधित मी, भेटला झरा आसवांचा... अशा एकाहून एक माणसाचा शोध घेणाऱ्या, मानवतेचा निरामय विचार मांडणाऱ्या भीमरावांनी भावविभोर केले. गझलांच्या या मैफिलीला किशोर बाली यांच्या निवेदनाने चांगलीच रंगत आणली. मराठी शब्दांना संगीताचे वलय देत शब्दांना अधिक अर्थप्रवाही करून भीमरावांनी रसिकांची दाद घेत हा कार्यक्रम उंचीवर नेला. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाला किती वेळा आणि कुठे दाद द्यावी, असा प्रश्न यावेळी रसिकांना पडला होता. एक सुरेल सायंकाळ यानिमित्ताने रसिकांना अनुभविता आली. (प्रतिनिधी)

Web Title: Finding God very much ... searching for a man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.