४०० रुपयांसाठी १२ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:08 AM2021-03-16T04:08:46+5:302021-03-16T04:08:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : ग्राहकाने त्याचा माेबाइल हॅण्डसेट दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये दिला. दुरुस्तीसाठी ४०० रुपयेही दिले; परंतु सर्व्हिस ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : ग्राहकाने त्याचा माेबाइल हॅण्डसेट दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये दिला. दुरुस्तीसाठी ४०० रुपयेही दिले; परंतु सर्व्हिस सेंटर चालकाने नियाेजित काळात माेबाइल हॅण्डसेट दुरुस्ती करून न देता घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे ग्राहकाने जिल्हा ग्राहक आयाेगाकडे दाद मागितली. ग्राहक आयाेगाने या प्रकरणाचा निवाडा देत सर्व्हिस सेंटर संचालकावर तब्बल १२ हजार रुपयांचा दंड ठाेठावला.
श्रीराम सातपुते, रा. खापरखेडा, ता. सावनेर यांनी त्यांच्या माेबाइलचे साॅफ्टवेअर अपडेट करण्यासाठी नागपूर शहरातील काॅमवेन या सर्व्हिस सेंटरमध्ये १२ ऑक्टाेबर २०१५ राेजी दिला हाेता. सर्व्हिस सेंटर संचालकाने यासाठी ४०० रुपयांची मागणी केल्याने श्रीराम सातपुते यांनी ही रक्कमही त्याला दिली. एका दिवसात काम हाेणार असल्याचे श्रीराम सातपुते यांना सांगण्यात आले हाेते. दाेन दिवस पूर्ण हाेऊनही काम न झाल्याने श्रीराम सातपुते यांनी सर्व्हिस सेंटर संचालकाकडून माेबाइल दुरुस्त न करता परत घेतला. मात्र, संचालकाने ४०० रुपये परत देण्यास नकार दिल्याने त्यांनी गणेशपेठ, नागपूर पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली.
पाेलिसांनी मध्यस्थी केल्याने सर्व्हिस सेंटर संचालकाने श्रीराम सातपुते यांना ३१ ऑक्टाेबर २०१५ राेजी बिल दिले. त्या बिलाच्या आधारे त्यांनी १० मे २०१६ राेजी सर्व्हिस सेंटर संचालकाविरुद्ध जिल्हा ग्राहक आयाेगाकडे तक्रार दाखल केली. ग्राहक आयाेगाने नाेटीस बजावनूही सर्व्हिस सेंटर संचालक आयाेगासमाेर हजर झाला नाही तसेच त्याने उत्तरही सादर केले नाही. त्यामुळे आयाेगाने श्रीराम सातपुते यांचे म्हणणे ऐकून घेत ग्राहक सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे मत नोंदविले. तक्रारकर्त्याकडून घेतलेले ४०० रुपये नऊ टक्के व्याज आकारून परत करण्याचे आदेश आयाेगाने ६ जानेवारी २०१७ राेजी सर्व्हिस सेंटर संचालकाला दिले.
हा निर्णय मान्य नसल्याने सर्व्हिस सेंटर संचालकाने २० एप्रिल २०१९ राेजी राज्य ग्राहक आयाेगाकडे अपील दाखल केले. आयाेगाचे अध्यक्ष ए. झेड. ख्वाजा यांनी ९ मार्च २०२१ राेजी सर्व्हिस सेंटर संचालकाचे अपील खारीज करीत जिल्हा ग्राहक आयाेगाचा निवाडा कायम ठेवला. तक्रारकर्त्याकडून ॲड. प्रेमचंद मिश्रीकोटकर यांनी युक्तिवाद केला.