उरलेले अन्न उघड्यावर फेकताय? खबरदार! होईल एक लाखापर्यंत दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 08:12 PM2022-10-27T20:12:35+5:302022-10-27T20:13:09+5:30
Nagpur News हॉटेल, रेस्टारेन्ट, मंगल कार्यालये, लॉन वा खासगी संस्थातर्फे सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महापालिका हरित लवाद कायद्यांतर्गंत १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावणार आहे.
नागपूर: हॉटेल, रेस्टारेन्ट, मंगल कार्यालये, लॉन वा खासगी संस्थातर्फे सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महापालिका हरित लवाद कायद्यांतर्गंत १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावणार आहे. अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांसोबतच आता रस्त्यावर अन्न टाकणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.
मनपाच्या उपद्रव शोध पथकाने काही दिवसांपूर्वी रामनगरातील एका सभागृहाला रस्त्यावर अन्न फेकण्यासाठी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी अन्न फेकण्याचे प्रकार थांबलेले नाही. नागरिकांनी उरलेले अन्न रस्त्यावर न टाकता, त्यापासून कम्पोस्ट तयार करावे किंवा कचरा कंपन्यांच्या स्वाधीन करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
मनपा पथकाकडून सध्या शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शहरात ब्लॅकस्पॉट तयार होऊ नयेत, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. काही ठिकाणी कचऱ्यासोबत उरलेले अन्नही टाकण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे दुर्गंधी, अस्वच्छता निर्माण होत आहे.
कचरा पॉइंटमुळे कुत्र्यांचा त्रास
कचरा साठविला जात असलेल्या लॅकस्पॉटवर नागरिकांकडून सर्रासपणे अन्न टाकण्यात येते. त्यामुळे कचऱ्याच्या अशा ढिगाऱ्यांच्या आसपास मोकाट कुत्रे अधिक दिसून येतात. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या एक लाखावर आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न उपलब्ध होत असल्यानेही मोकाट कुत्री वाढली वाढली आहेत.
नियोजनाची गरज
रस्त्यालगतच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून टाकण्यात येणारे अन्नपदार्थ, मास विक्रेत्यांकडून टाकण्यात येणारे उरलेल्या मांसाचे तुकडे, यामुळेही मोकाट कुत्रे व दुर्गंधीची समस्या वाढत आहे.े उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी न टाकता त्याचे योग्य नियोजन करून विल्हेवाट लावण्याची गरज आहे.