‘इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन’ला फिनलँड देणार ‘पॉवर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:20 AM2017-11-13T01:20:16+5:302017-11-13T01:20:28+5:30
‘इलेक्ट्रिक’ वाहनांसाठी मनपाने पुढाकार घेतला असून, शहरात नवीन ‘इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन’देखील विकसित करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘इलेक्ट्रिक’ वाहनांसाठी मनपाने पुढाकार घेतला असून, शहरात नवीन ‘इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन’देखील विकसित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञान फिनलँड या देशाकडून पुरविण्यात येणार असून, त्यासंबंधी रविवारी विशेष सामंजस्य करारदेखील करण्यात आला. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक,जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. फिनलँडच्या शिष्टमंडळाने ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनालादेखील भेट दिली.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल तसेच ‘फिनलँड’तर्फे ‘फोर्टम् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे उपाध्यक्ष अवधेश झा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यात ‘इलेक्ट्रिक स्टेशन’चा पायाभूत विकास व तंत्रज्ञानाचे सहकार्य हे मुद्दे प्रामुख्याने समाविष्ट आहेत.
यावेळी ‘फिनलँड’च्या राजदूत नीन वास्कुनलाहती, मनोनित राजदूत श्रेयस दोशी, नितीन सोमकुंवर, सुरेश पवार, परवेझ चुगतई, मारिया पाटेटोकानार्कारी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त मनपा आयुक्त रवंीद्र कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी फिनलँडच्या प्रतिनिधींना नागपुरातील विकासाबाबत माहिती दिली व गुंतवणुकीसाठी शहर कसे उपयुक्त आहे, यावर प्रकाश टाकला.