३१ लाखांची फसवणूक पोलिसांत तक्रार दाखल
By admin | Published: February 25, 2016 02:48 AM2016-02-25T02:48:46+5:302016-02-25T02:48:46+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची बनावट धनादेशाद्वारे ३१ लाखांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
बनावट धनादेशाद्वारे फसवणूक : विद्यापीठ देणार बँकेला नोटीस
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची बनावट धनादेशाद्वारे ३१ लाखांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणात ‘बँक आॅफ इंडिया’चादेखील दोष असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला असून, यासंदर्भात कायदेशीर नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. दरम्यान, संबंधित प्रकरणाचे विद्यापीठाच्या वित्त विभागात धागेदोरे असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.
एरवी पै पै चा हिशेब ठेवणाऱ्या नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनाला मोठा धक्का बसला. विद्यापीठान औषधीविज्ञानशास्त्र विभाग तसेच महावितरणच्या नावाने साडेचार हजारांचे दोन धनादेश तयार केले होते. हे दोन्ही धनादेश वटविण्यास ‘बँक आॅफ इंडिया’ने नकार दिला. याबाबत वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता याच क्रमांकाचे धनादेशअगोदरच वटले असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. यवतमाळ येथील ‘कॅनरा बँक’ येथे अजय जैन नावाच्या व्यक्तीने ‘बँक आॅफ इंडिया’चे दोन ‘बोगस’ धनादेश स्वत:च्या खात्यात ‘डिपॉझिट’ केले व त्यातून ३१ लाख रुपयांची रक्कम काढल्याची बाब समोर आली.
यासंदर्भात बुधवारी विद्यापीठात अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक झाली. संबंधित प्रकरणात बनावट चेक तर वापरण्यात आलेच आहेत. परंतु ‘बँक आॅफ इंडिया’चीदेखील तितकीच चूक आहे. या दोन्ही धनादेशावर ‘लोगो’देखील नसताना ते बनावट आहेत, हे बँकेच्या लक्षात कसे आले नाही.
चूक बँकेचीच
नागपूर : शिवाय काही दिवसांपूर्वी उघडण्यात आलेल्या खात्यावर इतकी मोठी रक्कम वटविली जात असताना विद्यापीठाला संपर्कदेखील करण्यात आला नाही. इतकेच काय पण पैसे खात्यातून वळते झाल्यानंतरदेखील त्याचा कुठलाही ‘एसएमएस’ विद्यापीठाला प्राप्त झाला नाही. या सर्व बाबी लक्षात घेता यात ‘बँक आॅफ इंडिया’ची चूक आहे. यासंदर्भात बँकेला कायदेशीर नोटीस पाठवण्यात येणार आहे. शिवाय बँकेकडून भरपाईदेखील मागण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. शिवाय विद्यापीठाकडून अंबाझरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा तक्रारदेखील दाखल केली.
वित्त विभागाची चौकशी नाही
या प्रकरणात बँकेची चौकशी पोलिसांकडून करण्यात येईलच. परंतु विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या धनादेशाचा तोच क्रमांक आणि वित्त व लेखा अधिकाऱ्यांची तंतोतंत खोटी स्वाक्षरी या बाबींमुळे वित्त विभागात याच्या ‘लिंक’ आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत कुलगुरुंना विचारणा केली असता त्यांनी अशी शक्यता असल्याची बाब खोडून काढली. यात वित्त विभागाची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही. पूर्ण दोष बँकेचाच असून तेच याला कारणीभूत आहे, असा दावा त्यांनी केला.(प्रतिनिधी)