फसवणूक करणा-या नागपूरच्या बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 04:35 PM2018-07-04T16:35:14+5:302018-07-04T16:36:13+5:30
सदनिका आणि दुकान विक्रीचा करारनामा करून रक्कम घेतल्यानंतर पाच वर्षे होऊनही बिल्डरने सदनिका किंवा दुकानाचा ताबा दिला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदनिका आणि दुकान विक्रीचा करारनामा करून रक्कम घेतल्यानंतर पाच वर्षे होऊनही बिल्डरने सदनिका किंवा दुकानाचा ताबा दिला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विजय कैलास जोशी (वय ४८) असे फसवणूक करणा-या बिल्डरचे नाव आहे. तो मनिषनगरातील रिलायन्स फ्र्रेशसमोरच्या रामदेव अपार्टमेंटमध्ये राहतो.
तक्रारदार उमेश प्रभाकर लांजेवार (वय ४८) हे कामठी मार्गावरील लघुवेतन कॉलनीत राहतात. आरोपी बिल्डर जोशी याने २०१३ मध्ये गोधनीत प्रफुल्ल पार्क नावाने सदनिका आणि व्यापारी संकुलाचा प्रकल्प उभारण्याचे जाहिर केले. त्यावेळी जोशीने लांजेवार यांना पहिल्या माळळ्यावर १०१ क्रमांकाची सदनिका आणि ग्राउंड फ्लोअरवर ३ क्रमांकाचा व्यापारी गाळा देण्याचा सौदा पक्का केला. त्यापोटी लांजेवार यांच्याकडून ४ लाख, ७८ हजार, ३७७ रुपये घेतले. सदनिका आणि दुकानाचा ताबा तीन वर्षांत देण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, पाच वर्षे होऊनही बिल्डर जोशीने सदनिका अथवा दुकानाचा ताबा लांजेवार यांना दिला नाही. सारखी टाळाटाळ होत असल्याने लांजेवार यांनी बिल्डरकडे विचारणा केली. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे चौकशी करून मंगळवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.