कोरोना रुग्णाच्या दागिने चोरीप्रकरणी एफआयआर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:08 AM2021-04-21T04:08:57+5:302021-04-21T04:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूर्व नागपुरातील आंबेडकर चौकात असलेल्या रेडियन्स हॉस्पिटलमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचे दागिने चोरीच्या तक्रारीवर लकडगंज पोलिसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील आंबेडकर चौकात असलेल्या रेडियन्स हॉस्पिटलमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचे दागिने चोरीच्या तक्रारीवर लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास आरंभला आहे. सीसीटीव्हीचाही आधार यासाठी घेतला जात आहे.
कोरोना संक्रमितांचे दागिने चोरले जात असल्याची तक्रार ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. सोमवारी (दि. १९) क्वार्टर येथील फळव्यापाऱ्याने १५ एप्रिलला कोरोनासंक्रमित असलेल्या आपल्या पत्नीला रेडियन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्या पत्नीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. १६ एप्रिलला दुपारी एक वाजता मुलगा आयसीयूमध्ये आईला पाहण्यासाठी गेला असता आईच्या अंगावर दागिने दिसले नाहीत. त्याने रुग्णालयाचे संचालक डॉ. मनोज पुरोहित यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली. डॉ. पुरोहित यांनी त्यांना काऊंटरवर चौकशी करण्यास सांगितले. तेथील कर्मचाऱ्याने वाॅर्डबॉय आणि आयसीयूमधील कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांच्याकडे विचारणा केली असता कुणीही समाधानकारक उत्तर दिले नाही. मात्र आईची प्रकृती लक्षात घेता व्यापाऱ्याच्या मुलाने शांत राहणे पसंत केले.
या महिलेचा १७ एप्रिलला पहाटे मृत्यू झाल्यावर व्यापाऱ्याने लकडगंज पोलिसँत या संदर्भात तक्रार दाखल केली. या विषयावरील वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ३५ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची नोंद केली आहे. या कुटुंबाने आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचे नातेवाईक प्रचंड दु:खात असताना अशा प्रकारची घटना घडत असल्याने हा प्रकार अधिक चिंताजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारा ठरला आहे.