महाराजा डेव्हलपर्सचेसंचालक डांगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 08:59 PM2019-01-10T20:59:27+5:302019-01-10T21:05:00+5:30
बंगलो देण्याच्या नावाखाली अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी उपराजधानीतील बहुचर्चित बिल्डर, महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांच्याविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बिल्डर डांगरे विरोधात कारवाई व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पीडित गुंतवणूकदारांची कायदेशीर लढाई सुरू होती, हे विशेष!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बंगलो देण्याच्या नावाखाली अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी उपराजधानीतील बहुचर्चित बिल्डर, महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांच्याविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बिल्डर डांगरे विरोधात कारवाई व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पीडित गुंतवणूकदारांची कायदेशीर लढाई सुरू होती, हे विशेष!
डांगरे यांनी सन २००० मध्ये मौजा चिखली खुर्द येथील खसरा क्र. २७/१, प.ह.क्र. ३९ अ मध्ये ३ हेक्टर आर जमीन दिनकर सीताराम साफळे यांच्याकडून ६७ लाख ५० हजारात खरेदी करण्याचा सौदा केला होता. त्यानंतर २००४ मध्ये शेतमालकाकडून त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी घेतली. २००६ मध्ये डांगरे यांनी चिखली(खुर्द)मध्ये स्वराज पार्क रो-हाऊस-बंगलो स्कीम सुरू केली. केवळ दोन वर्षांत बंगल्याचा ताबा देण्याचा दावा केल्यामुळे स्वत:च्या मालकीच्या निवासस्थानाचे स्वप्न रंगविणाऱ्या ५० पेक्षा जास्त लोकांनी बिल्डर डांगरे यांना (कुणी १० तर कुणी २० लाखांची) अॅडव्हान्स रक्कम दिली होती. डांगरे यांच्याकडे बंगलो विकत घेण्याच्या नावाखाली अनेकांनी कोट्यवधी रुपये जमा केले होते. त्याला आता १३ वर्षे झाली. मात्र, डांगरे यांच्याकडून निर्माणाधीन बंगल्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर ज्यांनी आपली लाखोंची रक्कम गुंतविली, तीसुद्धा त्यांना परत करण्यात आली नाही. यासंबंधाने गुंतवणूकदारांनी आधी सक्करदरा पोलीस ठाण्यात आणि नंतर पोलीस उपायुक्तांसह अनेक वरिष्ठांकडे वारंवार फसवणुकीच्या तक्रारी केल्या. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस तक्रारकर्त्यांचे बयान नोंदवीत होते. मात्र, डांगरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याने स्वत:च्या बंगल्याचे स्वप्न रंगवून डांगरेंकडे लाखो रुपये जमा करणारी मंडळी कमालीची अस्वस्थ झाली होती.
ती जमीन आरक्षित!
ज्या जागेवर बंगलो देण्याची डांगरेंनी बतावणी केली होती, ती जमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असल्याचे माहीत पडल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. परिणामी ते बिल्डर डांगरे यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, डांगरे त्यांना भेटण्याचे टाळत होते, त्यांना शिवीगाळ करून धमकी देत होते. त्यामुळे घराचे स्वप्न बघणारे गुंतवणूकदार संतप्त झाले होते.
लोकमतने उचलला आवाज
यासंबंधाने सक्करदरा पोलिसांकडे गुंतवणूकदारांच्या वतीने नत्थूजी वानखेडे यांनी बिल्डर डांगरेंच्या विरोधात तक्रार केली होती. ते आमचा बंगला देत नाही, आमची रक्कमही परत करीत नाही आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देतात, असे तक्रारीत नमूद होते. त्यांच्या या तक्रारीची ठोस दखल घेतली जात नसल्याने गुंतवणूकदारांनी हे प्रकरण लोकमतकडे मांडले होते. १३ वर्षांपासून आम्हाला नुसते झुलविले जात आहे. बिल्डरांसोबत पोलीसही न्याय द्यायला तयार नसल्याची कैफियत रक्कम गुंतविणाऱ्यांनी मांडली होती. लोकमतने फसवणुकीचे हे प्रकरण लावून धरले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशीही संपर्क केला. त्यामुळे सक्करदरा पोलिसांनी प्रदीर्घ चौकशीनंतर गुरुवारी, १० जानेवारीला बिल्डर डांगरे यांच्याविरुद्ध फसवणूक (कलम ४२०) करून शिवीगाळ करणे तसेच धमकी (कलम ५०४, ५०६)देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर डांगरेंना पोलिसांनी अटक केली नव्हती.
फसवणुकीचा आकडा ४४.२५ लाखांचा
पोलिसांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, बिल्डर डांगरे यांनी लोकांकडून ४४ लाख २५ हजार रुपये गोळा केल्याचे सक्करदऱ्यातील गुन्हे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात ही रक्कम कितीतरी पट जास्त असल्याचे संबंधितांचे सांगणे आहे. गुन्हे अहवालात नोंदविलेला हा रकमेचा आकडा १३ वर्षांपूर्वीचा असल्याचे पोलीस सांगतात. त्यावेळचे जमीन मूल्य आणि ती रक्कम तसेच आजचे जमीन मूल्य लक्षात घेतल्यास ही रक्कम १० कोटींच्या वर जाते, असेही पोलीस खासगीत मान्य करतात.