कोरोनाची माहिती दडविणाऱ्यावर नागपुरात एफआयआर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:17 PM2020-04-16T20:17:08+5:302020-04-16T20:17:50+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामध्ये संसर्गित होऊनही लोक मनावर घेण्याच्या तयारीत नाहीत. कोरोनाची लागण झाल्याची शंका येऊनही याबद्दल प्रशासनासमोर माहिती लपविण्याचा प्रकार सुरू आहे. अशाच एका कोरोनाबाधित महिलेच्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूय नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामध्ये संसर्गित होऊनही लोक मनावर घेण्याच्या तयारीत नाहीत. कोरोनाची लागण झाल्याची शंका येऊनही याबद्दल प्रशासनासमोर माहिती लपविण्याचा प्रकार सुरू आहे. अशाच एका कोरोनाबाधित महिलेच्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या संक्रमणामुळे सतरंजीपुरातील एका ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला होता. यानंतर संबंधित मृत वृद्धाच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील काही व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यापासून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याच्या कामी पोलीस लागले आहेत. शांतिनगर परिसरातील एकच व्यक्ती त्या मृत वृद्धाच्या संपर्कात आला होता. त्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तो मेयो रुग्णालयातही गेला होता. मात्र प्रशासनाने वारंवार विचारणा करूनही त्याने ही माहिती दडवून ठेवली. मात्र परिसरातील नागरिकांना ही माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाला कळविले. त्यानंतर त्याला पत्नी आणि दोन मुलांसह क्वारंटाईन करण्यात आले. तपासण्यांमध्ये त्याची पत्नी पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने या घटनेकडे अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. अधिक तपास करता यावा यासाठी पोलिसांनी ही वस्ती सील केली. या दरम्यान कडक चौकशी केली असता त्याच्या कुटुंबात १३ सदस्य असल्याची बाब पुढे आली. त्या सर्वांची माहिती घेऊन सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.