नागपूर मनपातील अधिकारी-ठेकेदारांवर एफआयआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 08:43 PM2018-07-25T20:43:56+5:302018-07-25T20:45:05+5:30
रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषी मनपा उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उद्यान विभागातील अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषी मनपा उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उद्यान विभागातील अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
इंद्रप्रस्थ कॉलनी, सोनेगाव येथील रहिवासी असलेल्या ५३ वर्षीय साधना शशिकांत पुराडभट या ४ मार्च रोजी पतीसोबत बाहेर जेवण करायला गेल्या होत्या. पोलीस सूत्रानुसार रात्री ९.१५ वाजता पुराडभट दाम्पत्य दुचाकीने घराकडे जात होते. आकाशवाणी चौक ते जीपीओ चौकादरम्यान शिव मंदिरसमोर झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. मनपाच्या उद्यान विभागातील ठेकेदाराच्या माध्यमातून झाडाची कटाई करण्यात आली होती. परंतु कापलेल्या फांद्या रस्त्याच्या मध्येच टाकण्यात आल्या. फांदीवरून दुचाकी नेल्याने वाहन अनियंत्रित झाले व पुराडभट दाम्पत्य खाली पडून जखमी झाले. गंभीर जखमी असल्याने साधना यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला. शशिकांत पुराडभट आणि इतर लोकांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारवर मनपा उद्यान विभागातील अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध निष्काळजी बाळगल्याने मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्याने अनेक लोकांचा या फांद्यामुळे अपघात झाला. परंतु गंभीर जखमी न झाल्याने कुणी तक्रार केली नाही. साधना यांचा मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या हटविण्यात आल्या. पोलीस दोषी अधिकारी व ठेकेदाराचा शोध घेत आहेत.