धमकावणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवा : ‘जेएमएफसी’चे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 09:41 PM2018-10-25T21:41:27+5:302018-10-25T21:42:28+5:30
बलात्काराच्या प्रकरणात फसविण्याची धमकी देणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व आरोपांची आवश्यक चौकशी करून अंतिम अहवाल सादर करावा असे आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बलात्काराच्या प्रकरणात फसविण्याची धमकी देणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व आरोपांची आवश्यक चौकशी करून अंतिम अहवाल सादर करावा असे आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना दिले आहेत.
यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदम यांनी तक्रार दाखल केली होती. २०११ मध्ये मगदम हे इमामवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्याकडे संबंधित महिला आरोपी असलेल्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आली होती. दरम्यान, त्यांना महिलेला तिचे घर विकायचे असल्याचे कळले. मगदम यांनी ते घर २० लाख रुपयांत खरेदी केले. त्यासाठी त्यांनी १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. २०१४ मध्ये घराचे विक्रीपत्र नोंदविण्यात आले. त्यानंतर महिलेने मगदम यांना घराचा ताबा देण्यास नकार दिला. तसेच, ती मगदम यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देत होती. यासंदर्भात मगदम यांनी सुरुवातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पण त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी जेएमएफसी न्यायालयात धाव घेतली. मगदम यांच्यातर्फे अॅड. समीर सोनवाने यांनी बाजू मांडली.