बनावट कीटकनाशक तयार करणाऱ्या टोळीविरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:29 AM2018-10-04T00:29:31+5:302018-10-04T00:31:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कीटकनाशक तयार करून ती बाजारात विकून शासन व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभागाच्या सहायक संचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या गुणवत्ता नियंत्रण कार्यालयाचे तंत्र अधिकारी डॉ. योगिराज जुमडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश भद्दड रा. टिळकनगर अंबाझरी, असे आरोपीचे नाव आहे. भद्दड याचे लाव्हा खडगाव रोड येथे मे. गोविंद इंटरप्रायजेस आहे. त्यांना कृषी विभागाकडून कीटकनाशक औषध विक्री करण्याचा परवाना आहे. परंतु ते कीटकनाशक तयार करू शकत नाही. असे असताना आरोपी एम.एस. विलो वूड केमिकल प्रा. लि. वडोदरा गुजरात, एम.एस. श्री जी. टेस्टी साईड प्रा. लि. वडोदरा गुजरात यांना बनावट कीटकनाशक औषध तयार करून देण्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून दिला. तर बेलगाव उमरेड येथील एम.एस. मेट्रिक्स चेमर्स प्रा. लि. यांनी कुठलाही परवाना नसताना बनावट कीटकनाशकाचे बॉटलिंग करून दिले. या चौघंनी संगनमत करून तयार केलेली क्रिस्टल कॉप्सप्रोटेक्शन लि. या कंपनीची मिसाईल व बॅलेस्टिक हे बनावट कीटकनाशक बाजारात विकून शेतकरी व शासनाची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यावर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल केला आहे.