नागपुरात अंबाझरीतील डॉ. आंबेडकर स्मारकप्रकरणी एफआयआर दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 08:53 PM2023-01-16T20:53:46+5:302023-01-16T20:55:20+5:30
Nagpur News अंबाझरी तलावाशेजारील २० एकर जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृह जमीनदोस्त करून या जागेवर स्मारकाचा उल्लेख न करणाऱ्या दोषींविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी माहिती बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर : अंबाझरी तलावाशेजारील २० एकर जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृह जमीनदोस्त करून या जागेवर स्मारकाचा उल्लेख न करणाऱ्या दोषींविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी माहिती बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंबाझरी तलावाशेजारील ४४ एकर जागेवर ५७ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक अस्तित्वात होते. परंतु, ही जागा महाराष्ट्र शासनाने महापालिकेला आणि त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित केली. महामंडळाने ही जागा ऑनलाईन टेंडरद्वारे गरुडा अम्युझमेंट पार्क या कंपनीला दिली. या सर्व प्रक्रियेत या जागेच्या सातबारावर त्याची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे गरुडा अम्युझमेंट पार्क या कंपनीने टीनाचे शेड उभारून स्मारक जमीनदोस्त केले. या प्रकरणी गरुडा कंपनी, तलाठी अंबाझरी नागपूर, सर्कल अधिकारी नागपूर, महापालिका आयुक्त, पर्यटन मंत्रालयाचे सचिव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रमेश पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेला जे. बी. रामटेके, विश्रांती झांबरे, विशेष फुटाणे, डॉ. विनोद रंगारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ३ फेब्रुवारीला मोर्चा
चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब, निरक्षर आदिवासींच्या जमिनी हडपून खासगी कंपन्यांना विकण्यात आल्या असून यात आदिवासींना कुठलीही भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात व आदिवासी व शासकीय जमीन अतिक्रमणधारकांना न्याय देण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने ३ फेब्रुवारीला चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या हल्लाबोल मोर्चात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
............