नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील टायर कंपनीत अग्नितांडव; साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2023 10:33 PM2023-03-09T22:33:46+5:302023-03-09T22:37:23+5:30

Nagpur News उमरेड एमआयडीसी परिसरात असलेल्या प्लॉट क्रमांक ए-२९ येथील टायर कंपनीत आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास आग लागली.

Fire at Umred Tire Company in Nagpur District; Burn material | नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील टायर कंपनीत अग्नितांडव; साहित्य जळून खाक

नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील टायर कंपनीत अग्नितांडव; साहित्य जळून खाक

googlenewsNext

नागपूर : उमरेड एमआयडीसी परिसरात असलेल्या प्लॉट क्रमांक ए-२९ येथील टायर कंपनीत आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीचे तांडव इतके भयानक होते की, ३ ते ४ किमी. अंतरावरूनसुद्धा आगीच्या धुरांचे लोट आकाशात दिसून येत होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली हाेती.

आरबीसी इंडस्ट्रीज असे या टायर कंपनीचे नाव आहे. टायरवर प्रक्रिया करीत तेल काढण्याचे काम याठिकाणी केले जाते. कंपनीलगत ट्रान्सफार्मर आहे. गुरुवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. परिसरात सर्वत्र टायर आणि ज्वलनशील पदार्थ असल्याने क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. या परिसरात बहुसंख्य नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. धुरांचे लोट दिसून येताच अनेकांची धावपळ सुरू झाली. कंपनीचे अधिकारी सुशील बैस यांना सुरक्षारक्षकाने मोबाइलद्वारे सूचना दिली. अंदाजे एक लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे समजते. अग्निशमन दल तसेच पोलिस विभागही ‘ऑन दि स्पॉट’ पोहोचले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलास आग आटोक्यात आणण्यास ४ ते ५ तास लागले. होळी असल्याने मागील काही दिवसांपासून कंपनी बंद होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. तपासाअंती आगीचे नेमके कारण समजेल.

प्रदूषण नियंत्रण विभाग झोपेतच!

उमरेड एमआयडीसी परिसरात ४ ते ५ टायर कंपनीचे कार्य चालते. टायरपासून तेलनिर्मिती करणाऱ्या या कंपन्यांचा धूर परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सोबतच या परिसरात मोठ्या प्रमाणावर अन्नप्रक्रिया उद्योग असल्याने वायू प्रदूषणामुळे हे उद्योगसुद्धा प्रभावित होतात, असा आरोप केला जात आहे. मॉर्निंग वॉकला येणारे नागरिकही यामुळे त्रस्त असून, एमआयडीसी लगत शहराच्या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना या हानिकारक धुराचा त्रास सोसावा लागतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जी नियमावली दिली आहे, त्या नियमावलींचे पालन होताना दिसत नाही. यामुळे अनेकांना आरोग्य समस्येचा सामना करावा लागतो. अनेकदा याबाबतच्या तक्रारींचा पाढा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी वाचला. कुणीही गंभीरतेने घेतले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळही झोपेतच असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.

Web Title: Fire at Umred Tire Company in Nagpur District; Burn material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग