सुरेश भट सभागृहाचे फायर ऑडिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:57+5:302021-03-16T04:09:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाचे वर्ष उलटूनही वार्षिक देखभाल-दुरुस्तीबाबत विद्युत विभागाकडून आवश्यक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाचे वर्ष उलटूनही वार्षिक देखभाल-दुरुस्तीबाबत विद्युत विभागाकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने सभागृहाचे फायर ऑडिट झाले नाही. ते तीन दिवसात करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी सभागृहाची व्यवस्था व दुरुस्तीसंदर्भातील बैठकीत दिले.
फायर ऑडिटसंबंधी बी-फॉर्म पुढील तीन दिवसात अग्निशमन विभागाला न दिल्यास स्वत: सभागृह सील करू, असा इशाराही महापौरांनी दिला. उपमहापौर मनिषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
भट सभागृहात अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. याचा योग्य तऱ्हेने उपयोग केल्यास मनपाच्या महसुलात वाढ होईल. येेथील पार्किंग जागेचा उपयोग शहरातील मोठ्या कार कंपन्यांच्या कार प्रदर्शनासाठी देण्यात यावा व तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. सभागृहाच्या पार्किंगमध्ये मोठा हॉल आहे. हा हॉलसुद्धा कपड्यांचे, होम डेकोर तसेच विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंग तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना केली.
सभागृहाच्या देखभालीसाठी जबाबदारी वाटून देण्यात यावी. भट सभागृत फूड झोनसाठी जागा प्रस्तावित आहे. त्यामुळे या प्रस्तावित जागेवर गुढीपाडव्यापर्यंत फूड झोन सुरू करण्याचे निर्देश तिवारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.