फायर ऑडिट, नुसत्या गप्पातून होणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:33+5:302021-01-10T04:07:33+5:30
फहीम खान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू ...
फहीम खान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर प्रत्येक जण शोक व्यक्त करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेच राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याची घोषणा केली. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा रुग्णालयांचे ऑडिट करण्याची मागणी केली. वास्तविक लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार आजवर जे ऑडिट करण्यात आले त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशा परिस्थितीत ऑडिट झाले तरी याचा काहीही फायदा होणार नाही.
नियमानुसार दरवर्षी सरकारी इमारती व रुग्णालयांचे ऑडिट होत असल्याचे अग्निशमन विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगतात. संबंधित अग्निशमन विभागाकडून हा ऑडिट रिपोर्ट पाठविला जातो. वरिष्ठस्तरावर ऑडिट रिपोर्ट बघून त्रुटी दूर करण्याची आशा बाळगली जाते. सोबतच अग्निशमन विभागाशी संबंधित नियमानुसार निर्माण व्हावे, अशी अपेक्षा केली जाते. परंतु बहुसंख्य ऑडिट रिपोर्ट हे फाईलमध्येच पडून असल्याचे वास्तव आहे.
...
ऑडिट कोण करणार?
विदर्भातील सर्व सरकारी रुग्णालयांचे ऑडिट करण्यासाठी सक्षम अग्निशमन अधिकारीच नाहीत. पूर्व विदर्भाचा विचार केला तर फक्त नागपुरात महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके व उप मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे दोनच अग्निशमन अधिकारी उपलब्ध आहेत. अन्य कोणत्याही जिल्ह्यात अग्निशमन अधिकारी कार्यरत नाही. सर्व ठिकाणी ही पदे रिक्त आहेत.