नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 07:16 PM2020-04-13T19:16:59+5:302020-04-13T19:18:20+5:30
सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. थोड्याच वेळात ही आग दोन एकर परिसरात पसरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. थोड्याच वेळात ही आग दोन एकर परिसरात पसरली. धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. आगीमुळे घबराटही पसरली होती. अग्निशमन विभागाच्या पाच गाड्यांनी ही आग सायंकाळच्या सुमारास आटोक्यात आणली. आगीची माहिती मिळताच मनपाचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार घटनास्थळी पोहचले. अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या पोहचल्या. तसेच जेसीबीच्या साहाय्याने आग रोखण्यासाठी चर फाडून कचरा वेगळा करण्यात आला. त्यामुळे आग इतरत्र पसरली नाही. भांडेवाडी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे विन्ड्रोज तयार करण्यात आले आहे. या परिसराला ही आग लागली. १४ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आली. परंतु कचºयामुळे पुुन्हा आग लागण्याचा धोका लक्षात घेता पाण्याचा मारा रात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आला. अशी माहिती प्रदीप दासरवार यांनी दिली.भांडेवाडी परिसराला संरक्षण भिंत आहे. परंतु सूरजनगरच्या बाजूने काही ठिकाणी भिंत नादुरुस्त असून परिसरातील काही नागरिक भिंतीवरून डम्पिंग यार्डमध्ये येतात. याच बाजूने ही आग लागली होती. डम्पिंग यार्डला उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र विन्ड्रोजमुळे गेल्या वर्षी आग लागण्याची घटना घडली नव्हती.