नागपूरमध्ये औद्योगिक वसाहतीतील आरामशीनला आठवडाभरात दुसऱ्यांदा लागली आग
By मंगेश व्यवहारे | Updated: April 6, 2025 13:19 IST2025-04-06T13:18:25+5:302025-04-06T13:19:18+5:30
आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की परिसरात हाहाकार उडाला होता. अग्निशमन विभागाकडून सकाळीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

नागपूरमध्ये औद्योगिक वसाहतीतील आरामशीनला आठवडाभरात दुसऱ्यांदा लागली आग
-मंगेश व्यवहारे, नागपूर
लकडगंज येथील ८ आरामशीनला लागलेली आग विझून दोनच दिवस झाले असताना पुन्हा शनिवारी मध्यरात्री माँ उमिया औद्योगिक वसाहतीतील आरामशीनला आग लागली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की परिसरात हाहाकार उडाला होता. अग्निशमन विभागाकडून सकाळीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शनिवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला भंडारा रोडवरील माँ उमिया वसाहतीतील अतुल वूड प्रोडक्ट नावाने असलेल्या आरामशीनला आग लागल्याची माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच लगेच लकडगंज अग्निशमन केंद्रातून अग्निशमन पथक अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहचले. आगीची तीव्रता लक्षात घेता लकडगंज अग्निशमन केंद्र अधिकारी अकलिम शेख यांनी अतिरिक्त फायर टेंडरची मागणी केली.
आगीमध्ये आरामशीन व गोदामात मोठ्या प्रमाणात असलेले लाकुड जळाले. ११ फायरटेंडर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू होता. आग पूर्णपणे विझविण्यासाठी सकाळीही अग्निशमनचे पथक तैणात होते. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.
आरामशीनमध्ये फायर एक्स्टींग्युशरही असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अकलिम शेख यांच्यासह पारडी अग्निशमन केंद्राचे प्रमुख दुर्गाप्रसाद चौबे व सक्करदरा केंद्राचे प्रमुख शिवाजी शिर्के यांनी संयुक्तपणे कामगिरी बजावली.