नागपूरच्या संत्रा मार्केटला भीषण आग; २२ दुकाने खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:28 PM2019-12-21T23:28:48+5:302019-12-21T23:30:07+5:30
संत्रा मार्केट येथे शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत फळविक्रेत्यांची २२ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे या परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत्रा मार्केट येथे शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत फळविक्रेत्यांची २२ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे या परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. यात लाखो रुपयांचे नुक सान झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांना आठ तासानंतर शनिवारी सकाळच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
कॉटन मार्केट परिसरातील संत्रा मार्केट येथे शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानांतील ताट्या व तणसामुळे आग थोड्याच वेळात इतरत्र पसरली. यात फळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात फळविक्रेते जहीर अन्सारी, मंजूबाई घोडेस्वार, नंदाबाई गुप्ता, ओमप्रकाश प्रजापती, ओम साई ट्रेडर्स, लालाजी उईके, अंगालाल गौर, बबलू बैसवारे, ज्ञानेश्वर ठाकरे आदींच्या दुकानांचा समावेश आहे. जहीर अन्सारी, ज्ञानेश्वर ठाकरे, ओमप्रकाश प्रजापती आदींचे मोठे नुकसान झाले. अंदाजानुसार आगीमुळे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गंजीपेठ केंद्रातील तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. परंतु आगीचे भीषण स्वरूप लक्षात घेता अन्य केंद्रातील चार गाड्या बोलावण्यात आल्या. रात्री १२.३० च्या सुमारास लागलेली आग शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आटोक्यात आली. आगीमुळे फळे व फर्निचर जळून खाक झाली. तणसामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना चांगलीच कसरत करावी लागली.