नागपुरातील धरमपेठेत भीषण आगीत दुकाने जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:00 PM2018-02-28T14:00:39+5:302018-02-28T14:01:29+5:30
धरमपेठेतील तीन दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे साहित्य खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठेतील तीन दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे साहित्य खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. सोमवारी मध्यरात्री धरमपेठेतील अरुण कोटेचा यांचे महावीर मेवावाला, नंद भंडारजवळील श्याम गुप्ता यांच्या मालकीचे राज स्वीट भंडार तसेच उमेश शाहू यांचे शाहू ब्रदर्स ट्रेडर्स या दुकानांना मध्यरात्री भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांनी आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाने तत्काळ चार बंब घटनास्थळी रवाना करून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीतील नेमका नुकसानीचा आकडा समोर आला नाही. मात्र, लाखोंचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अजनीत वाहनांची जाळपोळ
एका घरासमोर उभ्या असलेल्या आॅटोसह चार वाहनांची बुरख्यात आलेल्या तिघा आरोपींनी जाळपोळ केली. अजनी ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यानगरात कल्पतरू बुद्ध विहाराच्या मागे सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
सोमवारी रात्री सुप्रिया देवीदास हेरोडे यांच्या अंगणात चार दिवसाआधी घेतलेली स्कुटी तसेच आॅटो आणि अन्य दोन वाहने उभी होती.
मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला कपडा बांधून आलेल्या तिघांनी त्यांच्या वाहनांवर पेट्रोल टाकून आग लावून दिली. या घटनेत हेरोडेंची नवीन दुचाकींसह तीन वाहने जळाली या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सुप्रिया हेरोडे व भानूदास हेरोडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.