फलाट क्रमांक सात जवळ रेल्वे यार्डमधिल सेक्शन इंजिनिअरच्या ऑफिसला आग
By नरेश डोंगरे | Published: July 18, 2023 02:30 PM2023-07-18T14:30:23+5:302023-07-18T14:31:55+5:30
आगीचे नेमके कारण अस्पष्ट
नागपूर : येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सात नजीक असलेल्या रेल्वे यार्डातील इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले.
फलाट क्रमांक सात जवळ ही जुनी इमारत आहे. नजीकच रेल्वे यार्डही असून तेथे रेल्वे गाड्यांमधील विजेच्या उपकरणाची दुरुस्ती केली जाते. बाजूला सेक्शन इंजिनिअर विभागाचे कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेनऊ ते दहा च्या सुमारास कर्मचारी कामावर गेले असता कार्यालयातून त्यांना धूर निघताना दिसला. आगीचा संशय आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर रेल्वेचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल तसेच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. कार्यालयाचे दार आणि खिडक्या सावधगिरीने उघडण्यात आल्या. त्यानंतर आतून आगीचे भीषण लोट बाहेर पडले.
बाहेरची बाहेरची हवा मिळताच आगीने रौद्ररूप धारण केले. ते पाहून घटनास्थळी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे गाड्यांमध्ये भरल्या जाणाऱ्या पाण्याच्या पाईपचा वापर करून ही आग विझविली.
दरम्यान, आगीच वृत्त कळतच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ही आग नेमकी कशामुळे लागली, ते वृत्त लिहीस्तोवर स्पष्ट होऊ शकले नव्हते. आगीत नेमकी काय काय नुकसान झाले, त्याचाही अहवाल सायंकाळपर्यंत येणार असल्याचे संबंधित अधिकारी म्हणाले.