किंग्जवे इमारतीमधील आग प्रकरण : दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:52 AM2019-01-11T01:52:43+5:302019-01-11T01:53:32+5:30
कस्तूरचंद पार्कजवळील निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीत बुधवारी लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून बेशुद्ध पडलेल्या १२ कामगारांना मेयोसह खासगी इस्पितळात दाखल केले. यातील दोन रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कस्तूरचंद पार्कजवळील निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीत बुधवारी लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून बेशुद्ध पडलेल्या १२ कामगारांना मेयोसह खासगी इस्पितळात दाखल केले. यातील दोन रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी होण्याची शक्यता आहे.
किंग्जवे हॉस्पिटलच्या आॅडिटोरीयमला आग लागल्यानंतर धुरामुळे श्वसनाचा त्रास झालेल्यांना कामगारांना दोन तासांच्या अवधीतच विविध रुग्णालयात दाखल केले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उमेश येरपुडे(४०), योगश डेहनकरे(२५), राजेंद्र शर्मा (२५) , धर्मिन वर्मा (४०), उमाबाई भंडारी(४०)जनाबाई निर्मलकर (४०), गणेश पेटकर, राहुल कावळे व पलाश लोहे यांना भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. परंतु रात्री उशिरा या सर्वांनी स्वत:च्या जबाबदारीने रुग्णालयातून सुटी घेतली. यातील पाच रुग्ण धंतोली येथील श्रीकृष्ण हृदयालयात दाखल झाले. येथील डॉक्टरांच्या मते या सर्वांची प्रकृती स्थिर असून शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येईल. परंतु रामदासपेठ येथील केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रामकृष्ण मौर्य, रामू मौर्य या दोन भावांची प्रकृती सुरुवातीपासूनच गंभीर आहे. या हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी रवी मंदीयार यांनी सांगितले, आगीच्या घटेनतील रुग्ण वेंकटरमन नायडू यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, परंतु रामकृष्ण मौर्य व रामू मौर्य हे दोघेही व्हेंटिलेटरवर आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर डॉ. कमल भुतडा लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी सांगितले.