शेतातील गाेठ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:52+5:302021-03-05T04:08:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वानाडाेंगरी : शेतातील गाेठ्याला अचानक आग लागल्याने तीन जनावरांचा हाेरपळून मृत्यू झाला तर अन्य दाेन जनावरे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वानाडाेंगरी : शेतातील गाेठ्याला अचानक आग लागल्याने तीन जनावरांचा हाेरपळून मृत्यू झाला तर अन्य दाेन जनावरे जखमी झाली. आगीत गाेठ्यात ठेवलेली शेतीपयाेगी अवजारे तसेच गुरांचा चारा जळून खाक झाला. सुदैवाने बैलजाेडी थाेडक्यात बचावली. ही घटना हिंगणा तालुक्यातील माेहगाव झिल्पी शिवारात मंगळवारी (दि.२) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
माेहगाव झिल्पी येथील प्रमाेद माणिकराव निघाेट यांच्या शेतातील गाेठ्याला मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याचे दिसून आले. ही बाब ध्यानात येताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ताेपर्यंत गाेठ्यात बांधून असलेल्या दाेन शेळ्या व एका वासराचा हाेरपळून मृत्यू झाला तसेच दाेन गाई भाजून जखमी झाल्या. बैलजाेडी थाेडक्यात बचावली. या आगीमुळे गाेठ्यात ठेवलेला जनावरांचा चारा (कुटार), ६० स्प्रिंकलर पाईप, पेट्राेल स्प्रेपंप व इतर शेतीपयाेगी अवजारे जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे माेठे आर्थिक नुकसान झाले.
हिंगणा पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक विनाेद नरवाडे करीत आहेत. आगीचे कारण कळू शकले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.