रुग्णालयात आगीचा भडका
By admin | Published: May 19, 2017 02:34 AM2017-05-19T02:34:13+5:302017-05-19T02:34:13+5:30
रामदासपेठ येथील तुली इम्पिरियलच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील एका बंद पडलेल्या खासगी रुग्णालयाला आग लागली.
रामदासपेठेतील घटना : शॉर्टसर्किट की निष्काळजीपणा?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामदासपेठ येथील तुली इम्पिरियलच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील एका बंद पडलेल्या खासगी रुग्णालयाला आग लागली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. परंतु स्थानिक नागरिकांनी मात्र या रुग्णालयात मनमानी पद्धतीने राहत असलेल्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचे सांगितले.
आग लागल्याची सूचना मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आग एका खोलीमध्येच लागली होती. त्यामुळे आग पसरली नाही किंवा खालपर्यंत आली नाही. परंतु धुरामुळे परिसरातील लोक हादरून गेले होते. काही वेळेसाठी तर वाहतूकही जाम झाली होती. या इमारतीमध्ये अनेक खासगी रुग्णालये आणि इतर दुकाने आहेत. दुकानदारांनी सांगितल्यानुसार दुसऱ्या माळ्यावर डॉ. पाटील यांचे खासगी रुग्णालय आहे. परंतु हे रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडले आहे. याच्या देखभालीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
बंद पडलेल्या या रुग्णालयात काही लोक राहतात. आत जागोजागी गाद्या टाकलेल्या आहेत. येथे बसूनच ते सिगारेट पितात. अशाच प्रकारच्या निष्काळजीपणातून ही आग लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
परंतु याबाबत अधिकृत मात्र कुणीही बोलायला तयार नाही.
मोठा अनर्थ टळला
ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या बाजूलाच दुसरे रुग्णालय आहे. येथे लहान मुलांना भरती करण्यात आले होते. आगीच्या घटनेमुळे या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक हादरून गेले होते. तातडीने मुलांना व दुसऱ्या रुग्णांना तातडीने सुरक्षित जागी हलविण्यात आले. तेव्हा कुठे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. आगीची व्याप्ती वाढली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
रुग्णालयातील सुरक्षितता चव्हाट्यावर
डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून नेहमीच ओरड केली जाते. डॉक्टरांच्या संघटना यासाठी आघाडीवर असतात. राज्य शासनाने यासंदर्भात कायदाही केला आहे. परंतु रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे काय? या घटनेमुळे मेडिकल हब बनलेल्या धंतोली व रामदासपेठ येथील रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.