नागपुरातील खापरखेडा वीज केंद्रात भीषण आग; कन्व्हेयर बेल्टसह केबल गॅलरी खाक; चार युनिट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:45 PM2021-12-08T17:45:20+5:302021-12-08T20:17:45+5:30
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य कन्वेअर बेल्टला आग लागली. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास लागली असून आग विझवण्याचे कार्य सुरू आहे. तर, कोळसा पुरवठा थांबल्यामुळे वीज केंद्रातील चार युनीटमधील उत्पादन ठप्प पडले आहे.
अरुण महाजन
नागपूर : खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या २१० मेगावॅट प्रकल्पात कन्व्हेयर बेल्ट आणि केबल गॅलरीला बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामुळे केंद्रातील २१० मेगावॅटच्या चार युनिटचे उत्पादन ठप्प झाले आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत वीज केंद्राचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी वार्षिक दुरुस्तीचे काम वेळेवर न झाल्यामुळे शॉर्टसर्किट झाल्याने केबल गॅलरीने पेट घेतला आणि यामुळे कन्व्हेयर बेल्ट जळाला, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कन्व्हेयर बेल्टला आग लागल्याचे कंत्राटी कामगारांना दिसून आले. त्यांनी लागलीच विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. केंद्रातील अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग विझविण्यात यश आले. आगीदरम्यान कन्व्हेयर बेल्ट आणि केबल गॅलरीमधील जळालेले साहित्य खाली पडत होते. प्रसंगी सर्व कामगारांना युनिटच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले. आगीमुळे कन्व्हेयरच्या पुल्ली, ॲडलर खाली पडत होते. कोळसा पूर्तता करणारी मुख्य लाईन जळून खाक झाली आहे. २०१९मध्ये कन्व्हेयर बेल्ट जळण्याची घटना या केंद्रात घडली होती. या घटनेचा बोध मात्र घेतला नाही.
...असा होतो पुरवठा
वीज केंद्राच्या सीएचपी विभागातून कन्व्हेयर बेल्टने कोळसा टॉवर टाऊन ३ (टीटी ३) पर्यंत पोहोचतो. येथून कोळसा टॉवर टाऊन ४ (टीटी-४)ला जातो. यानंतर बंकर आणि त्यापुढे कोल मिलपर्यंत पोहोचतो. कोलमिलमध्ये बारीक झालेला कोळसा पाईपद्वारे बॉयलरमध्ये जातो. सध्या टॉवर टाऊन ३, डी-३ आणि टॉवर टाऊन ४पर्यंतची केबल गॅलरी आणि कन्व्हेयर बेल्ट पूर्ण जळलेला आहे.
देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
वीज केंद्राचे अनेक विभाग जुने आहेत. याची वार्षिक देखभाल दुरुस्ती केली जाते. मात्र, गत २ वर्षांपासून या केंद्रात वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम झालेले नाही. वीज केंद्राकडे अशा आणीबाणीच्या वेळी दुरुस्तीसाठी साहित्यही उपलब्ध नाही.
वारंवार केले होते अवगत
देखभाल दुरुस्तीसंदर्भात खापरखेडा वीज केंद्र प्रशासनाकडून मुंबई येथील मुख्य कार्यालयाला वारंवार याबाबत अवगत करण्यात आले आहे. परंतु कार्यालयाकडून सकारात्मकता दर्शविण्यात आलेली नाही.
५०० मेगावॅटचे एक युनिट सुरु
आगीच्या घटनेमुळे २१० मेगावॅटची ४ युनिट बंद करण्यात आली. केंद्रात केवळ ५०० मेगावॅटचे एक युनिट सुरू आहे.
चौकशीअंती आगीचे नेमके कारण कळेल. वीज उत्पादनाचे काम सुरु करण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात आहेत.
- राजू घुगे, मुख्य अभियंता, खापरखेडा केंद्र