नागपुरातील मेडिकल परिसरात आग : वेळीच आग विझविल्याने दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 08:52 PM2019-04-23T20:52:38+5:302019-04-23T20:53:35+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) धोबीघाटच्या परिसरातील कचऱ्याला कुणीतरी लावलेली आग दुपारी १२.३० वाजता अचानक भडकल्याने खळबळ उडाली. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी तातडीने सतर्कता बाळगत आग पसरण्यास रोखले. विशेष म्हणजे, आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दुपारी १२.४० वाजता दिली. परंतु गाडी पोहोचायला तब्बल पाऊण तासाचा वेळ लागला. तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त आग विझविण्यात ‘एमएसएफ’च्या जवानांना यश आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) धोबीघाटच्या परिसरातील कचऱ्याला कुणीतरी लावलेली आग दुपारी १२.३० वाजता अचानक भडकल्याने खळबळ उडाली. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी तातडीने सतर्कता बाळगत आग पसरण्यास रोखले. विशेष म्हणजे, आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दुपारी १२.४० वाजता दिली. परंतु गाडी पोहोचायला तब्बल पाऊण तासाचा वेळ लागला. तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त आग विझविण्यात ‘एमएसएफ’च्या जवानांना यश आले होते.
मेडिकलमध्ये आगीच्या घटना नव्या नाहीत. तीन वर्षांपूर्वी अधिष्ठाता कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुलींचे वसतिगृह क्रमांक २ मध्ये विद्यार्थिंनीच्या दुचाकींना आग लावण्याची घटना घडली. यात १० दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. हे प्रकरण शांत होत नाही तोच मेडिकलच्या क्वॉर्टरमध्ये राहणारे डॉ. मुकेश वाघमारे यांच्या अंगणात असलेली उभी कार जाळली. या घटनेच्या काही महिन्यातच पुन्हा मुलींचे वसतिगृह क्रमांक २ मधील विद्यार्थिनींच्या दुचाकी जाळण्यात आल्या. गेल्या वर्षी अधिष्ठाता कार्यालयाच्या उद्यानातील कचऱ्याला आग लागल्याने धावपळ उडाली. या वर्षी पुन्हा आगीच्या घटनेने लक्ष वेधले.
प्राप्त माहितीनुसार, औषधवैद्यकशास्त्र विभागाचा वॉर्ड क्रमांक ४९ व धोबीघाटमधील भागात मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली आहेत. झाडांचा पालापाचोळा व कचरा येथे नेहमीच साचलेला असतो. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कुणीतरी या कचऱ्याला आग लावली. परंतु अर्ध्या तासातच आग भडकली. आगीच्या मोठ्या ज्वाळा उठू लागल्या. एमएसएफ’चे जवान धावून आले. त्यांनी झाडांच्या फांद्या तोडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करू लागले. याच दरम्यान एका जवानाने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. आग पसरू नये म्हणून जवानांनी चारही बाजूने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. यात त्यांना यशही आले. आग आटोक्यात आल्यानंतर तब्बल पाऊण तासांनी अग्निशमन दलाची गाडी आली. त्यांनी पाणी टाकून संपूर्ण आग विझविली. एमएसफचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी कि.ज. पाडवी व सुरक्षा पर्यवेक्षक शंकर तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश खानझोडे, सागर एकोटखाने, नरेंद्र वानखेडे, जाफर कासीम शेख, विकास चव्हाण यांनी आग विझविण्यात मदत केली. या कार्याचे मेडिकल प्रशासनाकडून जवानांचे कौतुक केले.