नागपुरात लागलेल्या आगीत महालगाव येथील चार आरामशीन खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 02:18 PM2019-04-13T14:18:29+5:302019-04-13T14:18:54+5:30
नागपूर भंडारा रोड महालगाव परिसरातील सहा आरा मशीनला शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात चार आरा मशीन येथील लाकूड व इतर साहित्य जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर भंडारा रोड महालगाव परिसरातील सहा आरा मशीनला शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात चार आरा मशीन येथील लाकूड व इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले असले तरी दुपारपर्यंत येथे धगधग सुरूच होती. यामुळे येथे एकच गोंधळ उडाला होता.
महापालिका क्षेत्राबाहेर भंडारा रोड महालगाव परिसरात आरा मशीन (सॉ मिल) आहेत. येथील सहा आरा मशीन असलेल्या परिसरात पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. येथील कापलेले व अन्य लाकूड पडून असल्याने आगीने अचानक भडका घेतला व लोळ आकाशात निघू लागले. ही आग आजूबाजूच्या परिसरात पसरते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. या घटनेची अग्निशमन दलास सकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे १० बंब व २५-३० जवान लगेच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. येथे सहा आरा मशीनला आग लागली असून चार आरा मशीनवरील जवळपास ९० टक्के मालमत्तेचे नुकसान झाल्याचे अग्निशमन विभागाच्या सूत्रानुसार समजते. येथे जीवितहानी झालेली नाही.