नागपूर येथील अग्निशमन अधिकाऱ्यांचा लूक बलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:57 PM2018-01-18T23:57:23+5:302018-01-18T23:58:36+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी लवकरच नव्या गणवेशात दिसणार आहे. गणवेश खरेदीबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी लवकरच नव्या गणवेशात दिसणार आहे. गणवेश खरेदीबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई, पुणे, ठाणे यासह राज्यातील सर्व शहरातील अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एकसमान गणवेश बनविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार गेल्या काही महिन्यापूर्वी सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गणवेश खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला होता.
फायरमन आणि अग्निशमन अधिकारी यांचा गणवेश ब्ल्यू पॅन्ट आणि पांढरा शर्ट, पिवळी कॅप आणि खांदा बॅच असा राहणार आहे. सोबतच लेदर शूज, टोपी, पट्टा, बक्कल , स्पोर्ट शूज, रेनकोट आदीं साहित्याचा यात समावेश आहे. पोलिसांप्रमाणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनादरम्यान ओळखता यावे यासाठी सर्व महापालिकांच्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गणवेश समान ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत गणवेश खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लवकरच लूक बदलणार आहे. यावर एक कोटीच्या आसपास खर्च येण्याची शक्यता आहे.